उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ कोटी ४१ लाखांची अफूची बोंडे जप्त !

६ शेतकर्‍यांवर गुन्हा नोंद !

अफूची लागवड केलेले क्षेत्र

इंदापूर (पुणे) – शहराजवळ असलेल्या होळकरवाडीत गव्हाच्या शेतीत अफूची लागवड केल्याची घटना ताजी असतांना इंदापूरमध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अफूची लागवड करण्यात आल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांनी उघड केला आहे. इंदापूर तालुक्यातील पळसदेवजवळ माळेवाडी गावात पोलिसांनी कारवाई करून १ कोटी ४१ लाख ७४ सहस्र रुपयांची ७ टन अफूची बोंडे जप्त केली. या प्रकरणी ६ जणांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ अफूची लागवड करण्यात आली होती. अफूची झाडे दिसू नये; म्हणून आरोपींनी लागवड क्षेत्राजवळ मका लावला आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अफूची लागवड करण्यात आल्याची माहिती इंदापूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे कारवाई केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अफूची लागवड करण्यात आल्याचे पाहून पोलीस अधिकारी चक्रावून गेले. साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भुमिका

एवढ्या मोठ्या प्रमाणात अफूची शेती होणे धोकादायक आहे. प्रशासनाने असे न होण्यासाठी प्रयत्न करावेत !