२ शिक्षकांसह ५ आरोपींना अटक !

बुलढाणा येथील पेपरफुटीचे प्रकरण

बुलढाणा – जिल्‍ह्यातील सिंदखेडराजा तालुक्‍यात ३ मार्च या दिवशी इयत्ता १२ वी परीक्षेच्‍या पेपरफुटीची घटना घडली होती. या प्रकरणी येथील पोलिसांनी २ शिक्षकांसह ५ आरोपींना अटक केली आहे. हा प्रकार सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाला होता. या पेपरफुटीचे पडसाद अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात उमटले होते.

अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पेपरफुटी प्रकरणाची छायाचित्रे दाखवून राज्‍य सरकारला धारेवर धरले होते. त्‍यानंतर पोलीस ठाण्‍यात अज्ञातांविरुद्ध गुन्‍हा नोंद करण्‍यात आला होता. हे प्रकरण साखरखेर्डा पोलिसांकडे वर्ग केले आहे. या प्रकरणाची महाराष्‍ट्र राज्‍य माध्‍यमिक आणि उच्‍च माध्‍यमिक मंडळाने गंभीर नोंद घेतली होती. पोलिसांनी अटक केलेल्‍यांमध्‍ये २ शिक्षक आहेत, तर ३ व्‍यक्‍ती स्‍थानिक परिसरातील आहेत.