मुलाला कॉपी पुरवणार्‍या वडिलांना पोलिसांनी दिला चोप !

अडावद (जिल्‍हा जळगाव) येथील परीक्षा केंद्रावरील घटना !

प्रतिकात्मक छायाचित्र

जळगाव – राज्‍यात दहावी-बारावीच्‍या परीक्षा चालू आहेत. यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे राज्‍यात कॉपीमुक्‍त अभियान राबवण्‍यात येत आहे. असे असतांनाही काही ठिकाणी सर्रासपणे कॉपी चालू असल्‍याच्‍या घटना समोर येत आहेत. दुसरीकडे प्रश्‍नपत्रिकेतील त्रुटी आणि पेपर फुटीमुळे परीक्षा मंडळाचा गोंधळ उडाला आहे. अशातच जळगाव जिल्‍ह्यातील चोपडा तालुक्‍यातील अडावद येथे ४ मार्च या दिवशी मुलाला कॉपी पुरवणार्‍या एका वडिलांना पोलिसांनी चोप दिल्‍याचा व्‍हिडिओ सामाजिक प्रसारमाध्‍यमांद्वारे प्रसारित झाला.

नूतन ज्ञानमंदिर विद्यालय, अडावद हे दहावीच्‍या परीक्षांसाठीचे केंद्र आहे. या केंद्रावर परीक्षा चालू असतांना कॉपी पुरवण्‍याचा प्रकार पोलिसांच्‍या निदर्शनास आला. परीक्षा काळात केंद्रापासून १०० मीटर अंतर हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्‍यात आले आहे. तसेच प्रत्‍येक केंद्रावर व्‍हिडीओ चित्रीकरण, सीसीटीव्‍ही, स्‍ट्राँग रूम अशा सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आल्‍या आहेत. कॉपी प्रकरण घडू नये यासाठी भरारी पथकांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. (मुलाला कॉपी देण्‍यासाठी पालक प्रतिबंधित क्षेत्रात कसे गेले ? बैठे पथक, सीसीटीव्‍ही यांसारख्‍या सुविधा असतांना हे प्रकार का घडतात ? याची गांभीर्याने नोंद घ्‍यायला हवी. तसेच सखोल चौकशी करून दोषींविरोधात कठोर कारवाई व्‍हायला हवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

मुलांवर कुसंस्‍कार करणारे पालक मुलांना काय घडवणार ?