‘वन्‍दे भारत एक्‍स्‍प्रेस’वर दगडफेक : भारताच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍यावर आघात !

वन्‍दे भारत एक्‍सप्रेस

उच्‍च तंत्रज्ञान आणि जागतिक स्‍तरावरील सोयीसुविधा यांनी युक्‍त असलेल्‍या ‘वन्‍दे भारत एक्‍सप्रेस’वर दगडफेक होणे, हे विरोधी पक्षांच्‍या राजकारणाची कुटील, दुटप्‍पी आणि मागासलेली मानसिकता दाखवते. त्‍यामुळे राष्‍ट्राच्‍या विकासामध्‍ये अडचण निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्‍यात आली पाहिजे. जेणेकरून देशविरोधी मानसिकता असणार्‍या अराजक तत्त्वांचे धैर्य वाढणार नाही.

‘वन्‍दे भारत एक्‍स्‍प्रेस’ हे नाव ऐकल्‍यावर आपल्‍या डोळ्‍यासमोर भारताच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍याचे चित्र उभे रहाते, तसेच ‘आम्‍हीही कुणाहून कमी नाही’, हा भाव तरळतो. ज्‍या गाडीने आपल्‍या देशाचे नागरिक विजेच्‍या गतीने त्‍यांच्‍या गावी सहजपणे आणि सर्व सुविधांसह पोचू शकतात, ती ‘वन्‍दे भारत एक्‍स्‍प्रेस’ या देशासाठी एक भेट आहे. अशा उज्‍ज्‍वल भविष्‍याचे चित्र उद़्‍ध्‍वस्‍त करून कुणाला काय मिळणार आहे ?

निहारिका पोळ-सर्वटे

१. देशात विविध ठिकाणी समाजकंटकांकडून ‘वन्‍दे भारत एक्‍स्‍प्रेस’वर दगडफेक

काही दिवसांपूर्वी बंगाल आणि विशाखापट्टणम्‌सह विविध ठिकाणी ‘वन्‍दे भारत एक्‍स्‍प्रेस’वर दगडफेक केल्‍याच्‍या बातम्‍या समोर आल्‍या. या घटनांनी केवळ एकच प्रश्‍न समोर आला की, या गोष्‍टी विशेष हेतू समोर ठेवून, तर होत नाहीत ना ? कि त्‍यांना ‘वन्‍दे भारत’ या नावाचीच समस्‍या आहे ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर २०२२ या दिवशी बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांच्‍या उपस्‍थितीत हावडा आणि न्‍यू जलपाईगुडी यांना जोडणार्‍या ‘वन्‍दे भारत एक्‍स्‍प्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला. त्‍यानंतर बंगालच्‍या जनतेला ‘वन्‍दे भारत’ शब्‍दाविषयी असलेली खरी समस्‍या समोर आली. १ आणि ३ जानेवारी २०२३ या दोन दिवसांमध्‍येच भारताचे भविष्‍यातील स्‍वप्‍न उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍यासाठी ‘वन्‍दे भारत एक्‍स्‍प्रेस’वर दगडफेक करण्‍यात आली. या दगडफेकीत ‘सी-३’ आणि ‘सी-६’ या बोगींच्‍या काचा फुटल्‍या. दार्जिलिंग जिल्‍ह्याच्‍या फांसीदेवा भागाजवळ न्‍यू जलपाईगुडीकडे जातांना या गाडीच्‍या खिडक्‍या फुटलेल्‍या दिसल्‍या. यापूर्वी उद़्‍घाटनाच्‍या दुसर्‍याच दिवशी ‘वन्‍दे भारत एक्‍स्‍प्रेस’वर दगडफेक केल्‍याची घटना समोर आली होती. ही घटना हावडा आणि न्‍यू जलपाईगुडी यांच्‍यामध्‍ये मालदाच्‍या कुमारगंज रेल्‍वेस्‍थानकावर घडली होती. या गोष्‍टी केवळ बंगालपर्यंतच सीमित नाही. विशाखापट्टणम्‌च्‍या कांचरापलेम्‌जवळ ‘वन्‍दे भारत’च्‍या डब्‍याच्‍या काचा फोडल्‍या होत्‍या. ही घटना ११ जानेवारीला घडली. अशाच प्रकारची घटना छत्तीसगडच्‍या जवळपासही घडली.

२. देशद्रोही घटकांना ‘वन्‍दे भारत’ नावाला समस्‍या !

या घटनांवरून असा प्रश्‍न निर्माण होतो की, केवळ नागरिकांसाठी प्रत्‍येक सुविधांनी युक्‍त असलेल्‍या या गाडीविषयी कुणाला अडचण असावी ? जेव्‍हा या गाडीचे उद़्‍घाटन करण्‍यात आले होते, तेव्‍हा ती एखादा धर्म किंवा जात यांच्‍यासाठीच चालणारी विशेष रेल्‍वेगाडी असल्‍याचे कुणी म्‍हटले नव्‍हते. तसेच ती एखाद्या विशेष समुदायासाठीही चालवण्‍यात येत नाही. मग सरकारने लोकांना दिलेल्‍या या भेटीमुळे कुणाला अडचण काय असू शकते ?

याचे उत्तर आपल्‍याला या गाडीच्‍या नावातच सापडते. यापूर्वी आपण सर्वांनी पाहिले की, ‘वन्‍दे मातरम्’ आणि ‘वन्‍दे भारत’ यांसारख्‍या घोषणांची बंगालमधील नागरिकांना समस्‍या राहिली आहे. ‘वन्‍दे मातरम्’ हे बंकिमचंद्र चट्टोपाध्‍याय यांच्‍यासारख्‍या सुप्रसिद्ध बंगाली कवीने लिहिले होते; परंतु याचा सर्वाधिक विरोध बंगालमध्‍येच झाला आणि तसाच विरोध आता ‘वन्‍दे भारत’ नावाच्‍या गाडीलाही होऊ लागला आहे. या समस्‍येमुळेच लोकांच्‍या सुविधेसाठी बनवलेल्‍या सरकारी संपत्तीला दिवसेंदिवस नष्‍ट करण्‍यात येत आहे. यावरून समाजाचे विभाजन करणारी मानसिकता बनल्‍याचे दिसते.

३. ‘वन्‍दे भारत एक्‍स्‍प्रेस’ची वैशिष्‍ट्ये

‘वन्‍दे भारत एक्‍स्‍प्रेस’ ही गाडी युरोप आणि अमेरिका येथील गाड्यांशी स्‍पर्धा करणारी आहे. तसेच ती वर म्‍हटल्‍याप्रमाणे देशाच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍याचे स्‍वप्‍न आहे, जे हळूहळू साकार होतांना दिसत आहे. आतापर्यंत ८ ‘वन्‍दे भारत एक्‍स्‍प्रेस’ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्‍यात आला आहे आणि येत्‍या काळात ही संख्‍या वाढत जाणार आहे. या रेल्‍वेगाडीचे काही वैशिष्‍ट्ये पाहूया.

अ. ‘वन्‍दे भारत एक्‍स्‍प्रेस’ किंवा ‘ट्रेन १६’ भारताची प्रथम इंजिनरहित रेल्‍वेगाडी आहे. ती  गाडी १६० किलोमीटर प्रति घंटा गतीने धावते. त्‍यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो.

आ. या गाडीतील प्रत्‍येक गोष्‍ट अत्‍याधुनिक आहे. ‘सीसीटीव्‍ही’ छायाचित्रके लावण्‍यात आली आहेत, स्‍वयंचलित आणि स्‍लायडिंग दारे आहेत, तसेच विमानांसारखी बायो टॉयलेट, अत्‍याधुनिक हायएंड वॉशरूम अशा सोयी आहेत. यात ‘इकॉनॉमी’ (सर्वसामान्‍यांसाठी) आणि ‘एक्‍झिक्‍युटीव्‍ह’ (विशेष) वर्ग’ असे दोन विभाग आहेत. तसेच १६ वातानुकूलित ‘चेअर कार कोच’ आहेत.

इ. उत्तम भोजन व्‍यवस्‍था : या गाडीमध्‍ये तिकिटाच्‍या मूल्‍यातच भोजनाचा समावेश केला आहे. आपण नवी देहली ते वाराणसी प्रवास करत असल्‍यास आपल्‍याला रेल्‍वेतच न्‍याहारी आणि दुपारचे जेवण, तर रात्री वाराणसी ते नवी देहली प्रवास करत असल्‍यास गाडीतच चहा-न्‍याहारी आणि रात्रीचे भोजन देण्‍यात येते.

ई. ऑनबोर्ड वायफाय व्‍यवस्‍था : या गाडीत इंटरनेट वापरासाठी ‘ऑनबोर्ड वायफाय’ची सुविधा देण्‍यात आली आहे. तसेच ‘जी.पी.एस्.’वर आधारित आधुनिक प्रवास सूचनाप्रणालीद्वारे  मार्गात येणार्‍या स्‍थानकांविषयी अद्ययावत माहिती दिली जाते.

उ. दिव्‍यांगांसाठी (अपंगांसाठी) विशेष व्‍यवस्‍था : प्रवास करतांना दिव्‍यांग व्‍यक्‍तींना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी काही डब्‍यांमध्‍ये ‘व्‍हील चेअर’ ठेवण्‍यासाठी जागा आहेत.

४. ‘मेक इन इंडिया’ची (भारतात उत्‍पादित केलेली) संपूर्ण स्‍वदेशी रेल्‍वेगाडी

ही गाडी चेन्‍नईच्‍या ‘इंट्रीगल कोच’ या कारखान्‍यात बनवण्‍यात आली आहेत. ‘मेक इन इंडिया’मध्‍ये उत्‍पादित झालेली रेल्‍वेगाडी ‘वन्‍दे भारत एक्‍स्‍प्रेस’ हिला चेन्‍नईमध्‍ये केवळ १८ मासांतच बनवण्‍यात आले आहे. यापूर्वी भारत युरोपमधून रेल्‍वेगाड्या आयात करत होता. आता त्‍याच्‍या ४० टक्‍के पैशातच ही गाडी बनवून पूर्ण झाली आहे.

– निहारिका पोळ-सर्वटे (साभार : मासिक ‘विवेक, हिंदी’, फेब्रुवारी २०२३)