संपूर्ण कुटुंबाची निःस्वार्थपणे काळजी घेणारे सांताक्रुझ, मुंबई येथील श्री. सुरेश गुलाबचंद गडोया (वय ८६ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त !

श्री. सुरेश गडोया

१. परिचय

माझे वडील श्री. सुरेश गुलाबचंद गडोया यांचा जन्म १८.४.१९३६ मध्ये गुजरात येथील मंग्रोल या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मंग्रोल येथे, तर उच्च शिक्षण राजकोट येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईला आले. शिक्षण घेत असतांनाच ते एके ठिकाणी नोकरीही करत होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आर्थिकदृष्ट्या थोडी स्थिरता आली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते एका प्रवासाच्या आस्थापनात कामाला लागले.

२. वडिलांचे प्रारंभीचे जीवन खडतर असणे; परंतु नंतर चांगली नोकरी मिळाल्यावर सर्व चांगले होणे

माझ्या वडिलांचे जीवन खडतर होते. लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. वडिलांच्या सावत्र आईने त्यांना आणि त्यांच्या भावांना पुष्कळ छळले. माझी आई दुसर्‍यांदा गर्भवती असतांना एके दिवशी माझ्या सावत्र आजीने माझ्या आई-वडिलांना घराबाहेर काढले. माझ्या वडिलांना तान्हे बाळ आणि गरोदर बायको यांना घेऊन मध्यरात्री घर सोडावे लागले. देवाच्या कृपेने त्यांच्या एका मित्राच्या साहाय्याने त्यांना एका चाळीत रहायला जागा मिळाली; मात्र त्यानंतर त्यांच्या जीवनात सर्व चांगले झाले. त्यांना एका नामांकित ‘एअरलाईन्स’च्या आस्थापनात (‘जपान एअरलाईन्स’मध्ये) नोकरी मिळाली आणि लवकरच ‘व्यवस्थापक’ म्हणून त्यांना बढती मिळाली.

३. सर्व कुटुंबियांना निःस्वार्थपणे साहाय्य करणे

घर साेडले असले, तरी माझे वडीलच त्यांच्या आई-वडिलांना पैसे देत असत. माझे वडील मोठे असल्याने कुटुंबातील इतर सर्व मंडळी आर्थिक साहाय्य हवे असल्यास वडिलांनाच विचारत असत. माझे वडीलही त्यांना निःस्वार्थपणे साहाय्य करत असत. ‘देव आहे आणि तो सर्व गोष्टींची काळजी घेईल’, असे ते नेहमी म्हणत असत. माझ्या काकांना दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची काळजी माझे वडीलच घेत होते. ते त्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देत होते. मलाही विदेशात जाऊन तेथे स्थायिक होण्यासाठी माझ्या वडिलांनीच साहाय्य केले.

४. ‘स्थिर रहाणे’, हा माझ्या वडिलांचा सर्वांत मोठा गुण आहे. वर्ष २००१ मध्ये माझ्या आईचे निधन झाले. तेव्हाही ते स्थिर होते आणि कुटुंबाला आधार देत पुढे जात राहिले.

५. वडिलांमध्ये जाणवलेले चांगले पालट

श्री. देवांग गडोया

वर्ष २०१६ मध्ये आम्ही कॅनडाहून मायदेशी आलो. त्या वेळी आम्हाला त्यांच्यामध्ये पुढील पालट जाणवले.

अ. पूर्वीच्या तुलनेत ते अधिक शांत झाले आहेत.

आ. त्यांचे परिस्थिती स्वीकारण्याचे प्रमाण वाढले आहे.

इ. त्यांच्या स्वभावातील कडकपणाही न्यून झाला आहे.

ई. पूर्वी त्यांच्या आवडी-निवडी आणि विशिष्ट पदार्थ खाण्याच्या सवयी होत्या. आता त्यांना कोणताही पदार्थ करून दिला, तरी ते आनंदाने जेवतात.

उ. स्वावलंबी असणे : माझे वडील गोव्यात आमच्याकडे काही दिवस रहायला आले होते. ते आता ८६ वर्षांचे आहेत. या वयातही आम्हाला भेटण्यासाठी त्यांनी मुंबई ते गोवा हा प्रवास एकट्याने केला. माझे वडील अजूनही स्वतःची सर्व कामे स्वतःच करतात.

ऊ. एरव्ही त्यांना मोठ्या पलंगावर झोपण्याची सवय आहे; परंतु आमच्याकडील लहान पलंगावरही ते आनंदाने झोपले.

ए. ते मला अधून-मधून दूरभाष करून ‘तुला आर्थिक किंवा अन्य काही साहाय्य हवे आहे का ?’, असे विचारत असतात.

६. ‘आश्रमात सर्वकाही व्यवस्थित आणि छान आहे, तसेच आश्रमातील सर्व साधक भगवंताचे भक्तच असून ते सर्व एका कुटुंबासारखे रहात आहेत’, असे वडिलांनी सांगणे

गोवा येथे आले असतांना त्यांना आश्रम पहाण्याची पुष्कळ उत्सुकता होती. त्यांचे वय अधिक असल्यामुळे चाकाच्या खुर्चीवर (व्हिल चेअरवर) बसून त्यांनी जवळजवळ २ घंटे संपूर्ण आश्रम पाहिला. आश्रम पाहिल्यानंतर ते म्हणाले, ‘‘आश्रमातील सर्व साधक भगवंताचे भक्तच आहेत. ते सर्व एका कुटुंबासारखे रहात आहेत. एवढा मोठा आश्रम चालवणे किती कठीण असेल; परंतु येथे सर्वकाही व्यवस्थित आणि छान आहे. हे खरोखर आश्चर्यकारक आहे.’’

७. वडील एरव्हीपेक्षा अधिक झोपत असल्याचे पाहून काळजी वाटणे; परंतु झोपलेले असतांना ते ध्यानावस्थेत जात असल्याचे नंतर लक्षात येणे

वडील आमच्याकडे वास्तव्यास असतांना ‘ते एरव्हीपेक्षा अधिक झोपतात’, असे मला वाटले. त्यामुळे मला थोडी काळजी वाटत होती. त्याविषयी मी त्यांना विचारले. तेव्हा ‘झोपल्यावर मला बरे वाटते’, एवढेच ते सांगू शकले. नंतर माझ्या लक्षात आले, ‘ते झोपलेले असतांना ध्यानावस्थेत जात होते आणि त्यांना त्याची जाणीवही नसायची. ते झोपेतून उठल्यावर एकदम ताजेतवाने असायचे.’

८. माझे वडील मुंबईला परत गेल्यानंतर आमच्याकडे ज्या खोलीत ते रहात होते, तेथील स्पंदने चांगली वाटत आहेत. तेथे गेल्यानंतर आमचे मन शांत होते आणि आपोआप नामजप चालू होतो.

९. ‘वडिलांची साधना चांगली चालू असून त्यांची प्रगती होत आहे’, असे एका संतांनी सांगणे

आश्रमात असतांना एकदा त्यांची भेट एका संतांशी झाली. त्या वेळी वडिलांना ‘मला देवच भेटला’, असे वाटले. माझ्या वडिलांविषयी बोलतांना ते संत म्हणाले, ‘‘त्यांची साधना चांगली चालू असून त्यांची प्रगतीही होत आहे.’’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादामुळे मी हे सर्व लिहू शकलो. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. देवांग गडोया, फोंडा, गोवा.