धर्मकार्याची तळमळ असलेले आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती अपार भाव असलेले मडगाव, गोवा येथील अधिवक्‍ता प्रमोद हेदे (वय ७० वर्षे) !

‘वर्ष २०१० मध्‍ये मी अधिवक्‍ता प्रमोद हेदे यांच्‍या कार्यालयात काम करत असतांना माझी त्‍यांच्‍याशी ओळख झाली. मला आणि श्री. सत्‍यविजय नाईक यांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

अधिवक्‍ता प्रमोद हेदे

१. श्री. उदेश कोरगावकर, काणका, म्‍हापसा, गोवा.

१ अ. प्रेमळ आणि आपुलकीचे बोलणे : अधिवक्‍ता प्रमोद हेदे यांची रहाणी साधी आहे. ते एक वरिष्‍ठ शासकीय अधिवक्‍ता असूनही सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने बोलतात अन् सर्वांशी मिळून-मिसळून रहातात. ते बोलत असतांना ‘त्‍यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते.

(शासकीय अधिवक्‍ता प्रमोद हेदे यांच्‍याप्रमाणे सर्वच अधिवक्‍ते आणि इतर शासकीय अधिकारी झाल्‍यास भारतातील वातावरण किती आदर्श होईल ! – संकलक)

१ आ. शिकण्‍याची वृत्ती : ते अभ्‍यासू वृत्तीचे आहेत. ते सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत राहून मिळेल, ते ज्ञान घेत रहातात.

श्री. उदेश कोरगावकर

१ इ. ते इतरांना साहाय्‍य करतात आणि सर्वांना समजून घेतात.

१ ई. परिस्‍थिती स्‍वीकारणे : त्‍यांचे मडगाव येथून पणजीला स्‍थानांतर केले गेले. तेव्‍हा त्‍यांची पदोन्‍नती व्‍हायची होती; पण पूर्वीच्‍या वरिष्‍ठांनी त्‍यांची मुदत वाढवून घेतल्‍यामुळे त्‍यांची पदोन्‍नती झाली नाही, तरीही ते शांत होते. त्‍यांनी सर्व देवावर सोडून दिले होते.

१ ई. देवावर श्रद्धा असणे : त्‍यांची देवावर पूर्ण श्रद्धा आहे. ते म्‍हणतात, ‘‘माझ्‍या आयुष्‍यात जे घडते, ते देवच करत असतो. त्‍याला अपेक्षित असेच घडते.’’

१ उ. सनातन संस्‍थेवर असलेला लोभ ! : ते नियमित दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतात आणि त्‍यातील माहिती इतरांना सांगतात. त्‍यांचे वय ७० वर्षे असूनही ते सनातनच्‍या प्रत्‍येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्‍थित रहातात. त्‍यांना पुष्‍कळ अनुभूतीही येतात.’

२. श्री. सत्‍यविजय नाईक, ढवळी, फोंडा, गोवा.

श्री. सत्‍यविजय नाईक

२ अ. नम्रता : ‘अधिवक्‍ता प्रमोद हेदे हे मडगाव येथील रहिवासी आहेत. त्‍यांचा स्‍वभाव अत्‍यंत नम्र आहे. त्‍यांच्‍या बोलण्‍या-वागण्‍यात सहजता आहे.

२ आ. उत्‍साही आणि आनंदी : ते सतत उत्‍साही आणि आनंदी दिसतात. त्‍यांचा चेहरा सदैव हसरा असतो. ‘त्‍यांच्‍या चेहर्‍याकडे पहात रहावे आणि त्‍यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते.

२ इ. प्रेमभाव : एकदा मला त्‍यांच्‍या घरी जाण्‍याची संधी मिळाली. तेव्‍हा त्‍यांनी आमची प्रेमाने विचारपूस केली. त्‍यांनी ‘आश्रमातील सगळे साधक बरे आहेत ना ?’, अशी प्रेमाने विचारपूस केली.

२ ई. इतरांचा विचार असणे : ते नेहमी इतरांचा विचार करतात. ‘आपल्‍यामुळे इतरांना त्रास व्‍हायला नको’, याची ते काळजी घेतात.

२ उ. कर्तेपणा नसणे : ते कधीही स्‍वतःचा मोठेपणा सांगत नाहीत. त्‍यांनी अनेक वर्षे शासकीय काम केले असूनही त्‍यांच्‍या मनात ‘मी हे केले आहे’, असा विचार नसतो. ते म्‍हणतात, ‘‘देवानेच माझ्‍याकडून हे सर्व करून घेतले. देवानेच मला ही सेवेची संधी दिली.’’

२ ऊ. धर्मकार्याची तळमळ : त्‍यांना धर्मकार्याची तीव्र तळमळ आहे. २ वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्‍ह्यामधील बांदा येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. तेव्‍हा आयोजित केलेल्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या बैठकीला ते मडगावहून बांदा येथे आले होते. ते सनातन संस्‍थेच्‍या बैठका, अधिवेशन किंवा कुठलेही धर्मकार्य यांत आनंदाने सहभागी होतात. ते म्‍हणतात, ‘‘देवाने मला हे धर्मकार्य करण्‍याची संधी दिली आहे.’’

२ ए. सेवाभाव : ते आपली प्रत्‍येक कृती ‘सेवा’ म्‍हणून करतात. ते न्‍यायालयात शासकीय अधिवक्‍ता म्‍हणून काम करतांनाही ‘सेवा’, समजून करतात. त्‍यांनी भ्रष्‍टाचाराच्‍या विरोधात सातत्‍याने लढा दिला आहे. त्‍यांनी अनेक भ्रष्‍टाचाराचे खटले यशस्‍वीरित्‍या हाताळले असून त्‍या खटल्‍यातील भ्रष्‍टाचार्‍यांना शिक्षा झाली आहे. ते प्रतिदिन न्‍यायालयात जातांना ‘देवाने दिलेली सेवा करायला जात असून देवच ती करवून घेणार आहे’, असा भाव ठेवतात. त्‍यामुळे त्‍यांना त्‍या सेवेतून आनंद मिळतो.

२ ऐ. भाव

२ ऐ १. देवाप्रती असलेला भाव ! : त्‍यांच्‍या मनात देवाप्रती पुष्‍कळ भाव आहे. ते देवाविषयी बोलत असतांना अनेक वेळा त्‍यांची भावजागृती होते. त्‍यांचा अध्‍यात्‍माचा अभ्‍यासही चांगला आहे. त्‍यांनी अनेक आध्‍यात्मिक ग्रंथांचे वाचन केले असून त्‍यांना आध्‍यात्‍मिक स्‍तरावरच्‍या अनुभूतीही आल्‍या आहेत.

२ ऐ २. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याविषयी असलेला भाव !

अ. ते प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ पूर्ण वाचतात. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचल्‍याविना त्‍यांना चैन पडत नाही. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ घरी आले, म्‍हणजे परात्‍पर गुरु डॉक्‍टर (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) घरी आले’, असा त्‍यांचा भाव असतो.

आ. ते गुरुदेवांनी (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सांगितलेला नामजप आरंभापासून करत आहेत. त्‍यांची गुरुदेवांवर अपार श्रद्धा आहे. त्‍यांना सातत्‍याने गुरुदेवांच्‍या अस्‍तित्‍वाच्‍या अनुभूती येतात.

इ. त्‍यांना गुरुदेवांना भेटण्‍याची पुष्‍कळ तळमळ होती. वर्ष २०२२ मध्‍ये गुरुदेवांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त काढलेली रथयात्रा पहाण्‍यासाठी त्‍यांना यायचे होते; त्‍यांच्‍या वैयक्‍तिक अडचणीमुळे त्‍यांना येता आले नाही. याविषयी त्‍यांच्‍या मनामध्‍ये पुष्‍कळ खंत होती. त्‍यांची एवढी तळमळ होती की, देवाने रामनाथी (गोवा) येथील एका सत्‍संगाला येण्‍याचे त्‍यांचे नियोजन केले. हे कळल्‍यावर त्‍यांना पुष्‍कळ आनंद झाला. ते म्‍हणाले, ‘‘मला गुरुदेवांना भेटण्‍याची पुष्‍कळ इच्‍छा होती. गुरुदेवांनीच माझी इच्‍छा पूर्ण केली.’’

(वरील सर्व सूत्रांचा दिनांक २५.११.२०२२)