सनातन धर्माच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर षड्यंत्र ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री

टीकमगड (मध्यप्रदेश) – सनातन धर्माच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर षड्यंत्र आखण्यात आले आहे. हत्ती बाजारात जातांना सहस्रो कुत्रे भुंकतातच ! तुम्ही आमच्यावर जळत आहात; परंतु आम्ही आमचे कार्य चालूच ठेवणार ! आम्हाला धमक्या मिळत असून घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु आम्ही मैदान सोडून पळणार नाही, असे रोखठोक प्रतिपादन बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले. बागेश्वर धामच्या वतीने येथे ७ दिवसांचा दरबार भरवण्यात आला आहे. या निमित्ताने धीरेंद्रकृष्ण शास्त्री पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप केले जात आहेत. त्या आरोपांचे त्यांनी या वेळी खंडण केले.

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की, हिंदु आणि मुसलमान यांच्यातील संघर्ष समाप्त करण्यासाठीच आम्ही हिंदु राष्ट्राची मागणी करत आहोत. भारत हिंदूंसाठी देऊन टाकला पाहिजे. आम्ही असे म्हणत नाही की, इतरांनी येथून पळून जावे. आम्हाला सर्व धर्मांचे लोक हवे आहेत. हिंदु राष्ट्र एका कल्पवृक्षाप्रमाणे आहे. याची सावली सर्वांना मिळत राहील. जातीयवाद नष्ट करण्यासाठीच आम्हाला हिंदु राष्ट्र हवे आहे. भारतात सामाजिक सौहार्द निर्माण करण्याचाच आमचा उद्देश आहे. भारताच्या राज्यघटनेत १२५ वेळा पालट करण्यात आले आहेत, तर ‘हिंदु राष्ट्रा’साठी आणखी एकदा तो केला जाऊ शकतो.