कळे (तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर), २३ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु राजे असून त्यांना ‘सेक्युलर’ दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या काळात गोहत्या, महिलांवरील अत्याचार, बलपूर्वक धर्मांतर आदी समस्यांवर हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांचा कायमचा बंदोबस्त केला. ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, वक्फ बोर्डाला दिलेली अमर्याद सवलत, हलाल जिहाद अशा समस्या संपवण्यासाठी पुन्हा हिंदु राष्ट्रच आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी वेळ देणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. ते १८ फेब्रुवारीला कळे येथील संयुक्त शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित ‘हिंदवी स्वराज्य ते हिंदु राष्ट्र’ या विषयावर बोलत होते. या प्रसंगी २५० जिज्ञासू उपस्थित होते.
या प्रसंगी ‘छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतांना’ या विषयावर प्रा. नवनीत नंदकुमार यशवंतराव यांचे व्याख्यान झाले. याच समवेत १९ फेब्रुवारीला शिवज्योत आगमन पूजन, जन्मकाळ सोहळा, रांगोळी स्पर्धा, पारंपरिक वाद्यांच्या गजरात शोभायात्रा यांसह अन्य कार्यक्रमही झाले.
१. कणेरीवाडी येथील ‘मावळा ग्रुप कणेरीवाडी’ यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात श्री. किरण दुसे यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली. या प्रसंगी १२५ हून अधिक शिवप्रेमी उपस्थित होते.
२. राधानगरी येथील नरतवडे (ता. राधानगरी) या भागात हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी यांनी व्याख्यान घेतले. त्यासाठी पुष्कळ जिज्ञासू उपस्थित होते.