लोकअदालतीमुळे नवी मुंबई पालिकेच्‍या तिजोरीत ४ कोटी रुपये जमा

नवी मुंबई,२२ फेब्रुवारी (वार्ता.) – एल्.बी.टी., सेस आणि मालमत्ता कर ग्राहकांनी नुकत्‍याच झालेल्‍या लोक अदालतीमध्‍ये महापालिकेचा सुमारे ४ कोटी रुपयांचा कर भरला आहे, अशी माहिती अतिरिक्‍त आयुक्‍त सुजाता ढोले यांनी दिली.

लोकअदालतीचे आयोजन तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्‍या माध्‍यमातून करण्‍यात आले होते. यामध्‍ये कायद्याद्वारे निर्माण केलेल्‍या वादावर समेट किंवा तडजोड हा मार्ग काढला जातो. त्‍यानुसार नवी मुंबई महापालिकेच्‍या मालमत्ता कर आणि एल्. बी.टी./ सेस विभागाच्‍या वतीने अनेक वर्षांपासून थकित कराच्‍या वसुली प्रकरणी ग्राहकांना वारंवार नोटिसा पाठवल्‍या जातात. यांतील काही प्रकरणांमध्‍ये महापालिकेने न्‍यायालयात दावा प्रविष्‍ट करण्‍यापूर्वी संबंधितांना नोटीस पाठवून लोक अदालतीमध्‍ये प्रकरण मिटवण्‍याची सूचना केली जाते. त्‍यानुसार एल्.बी.टी./ सेस विभागाच्‍या वतीने १ सहस्र १०० नोटिसा पाठवण्‍यात आल्‍या होत्‍या. (जनतेने वेळेत कर भरणे अपेक्षित असतांना त्‍यासाठी तिला नोटीस पाठवण्‍यासाठी यंत्रणा राबवावी लागणे आणि त्‍याचा व्‍यय करावा लागणे, हे चुकीचे आहे ! – संपादक)

यामध्‍ये ३ कोटी रुपये वसूल झाले. तसेच मालमत्ता कर विभागाने पाठवलेल्‍या ५११ नोटिसांपैकी ९० टक्‍के मालमत्ताकरधारकांनी प्रतिसाद देत १ कोटी ५ लाख रुपये भरले आहेत.

सध्‍या मालमत्ता कर अभय योजना राबवण्‍यात येत आहे, याचा ग्राहकांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन सुजाता ढोले यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका 

क्षमता असूनही जनता कर थकित ठेवते, त्‍यासाठी तिला दंडित करणे आवश्‍यक आहे !