उत्तराखंडमध्ये कधीही होऊ शकतो मोठा भूकंप !

राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांची चेतावणी !

एन्.जी.आर्.आय. संस्थेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन्. पूर्णचंद्र राव

नवी देहली – उत्तराखंडमध्ये कधीही भूकंप होण्याची शक्यता राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेने (एन्.जी.आर्.आय.ने) व्यक्त केली आहे. ही माहिती अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा उत्तराखंडमधील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जोशीमठ येथील घरे, दुकाने, हॉटेल यांना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे सहस्रो लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.

एन्.जी.आर्.आय. संस्थेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन्. पूर्णचंद्र राव यांनी सांगितले की, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली विविध स्तर असतात, ज्यांची सतत हालचाल होत असते. भारतातील पृष्ठभागाखालील स्तर प्रतिवर्षी ५ सेंटीमीटरने सरकत आहे. याने दबाव निर्माण होत असून मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. हिमाचल, उत्तराखंडसह नेपाळच्या पश्चिम भागात कधीही भूकंप होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर आम्ही उत्तराखंडमध्ये १८ केंद्रे स्थापन केली आहेत.