अंनिसच्या कार्यक्रमांना दिलेली अनुमती रहित करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

सिंधुदुर्गातील शाळांमध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमांना अनुमती

निवासी उपजिल्हाधिकारी आयुषकुमार सोनवणे यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

सिंधुदुर्ग – अंधश्रद्धा निर्मूलन आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे या नावाखाली आयोजित कार्यक्रमांतून हिंदु धर्म, त्यातील चालीरिती, प्रथा-परंपरा, देवता, संत, धर्मग्रंथ यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टीका करण्यात आल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. या माध्यमांतून देशाच्या भावी पिढीला नीतीमूल्यांपासून दूर नेणे, त्यांच्या मनातील देव, धर्म, संत, धर्मग्रंथ आदी श्रद्धास्थानांवर आघात करून त्यांना ‘नास्तिक बनवणे’ हा एकमेव अजेंडा असल्याचे लक्षात येते. त्यामुळे असे कार्यक्रम जिल्ह्यातील शाळांमधून आयोजित करण्यास अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला अनुमती देऊ नये आणि दिली असल्यास ती तात्काळ रहित करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा प्रशासन, शिक्षणाधिकारी आणि पोलीस यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याविषयीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी आयुषकुमार सोनवणे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. मुस्ताक शेख, अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांना देण्यात आले. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रिया मिसाळ, कु. वैष्णवी मिसाळ, डॉ. अशोक महिंद्रे, सर्वश्री विजय मिसाळ, सुरेश दाभोळकर आणि गजानन मुंज उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. यापूर्वी राज्यात जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी यांना असे कार्यक्रम आयोजित करण्याविषयी पत्र पाठवण्यात आल्याचे समजले आहे. यापूर्वीच्या कार्यक्रमांतून हिंदु धर्म, तसेच धर्मग्रंथ, संत यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टीका करण्यात आल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. त्यामुळे वर्ष २००७ मध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्यावर ‘असे कार्यक्रम शाळेत चालू करू नये’, असे पत्र जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना पाठवण्याची वेळ आली होती.

२. बीड जिल्ह्यातही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काही कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे गोंधळ निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज आणि असंतोष पसरू नये, म्हणून असे कार्यक्रम रहित करण्याची वेळ आली होती.

३. तसेच ‘असे कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नये’, असे पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक यांनी संबंधितांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.

४. ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे राष्ट्रीय संघटक आणि नास्तिकतावादी विचारसरणीचे प्रा. शाम मानव यांनीही यापूर्वी धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये केली आहेत.

५. ही पार्श्वभूमी माहिती असूनही असे कार्यक्रम शाळांमध्ये झाल्यास, तसेच धार्मिक भावना दुखावल्या गेल्यास निर्माण होणार्‍या परिस्थितीला प्रशासन पूर्णपणे उत्तरदायी राहील.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे यांचे मौन; तर शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांची तत्परता

निवेदनाविषयी माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख म्हणाले, ‘‘मी अनुमती दिलेली नाही. कदाचित् प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी अनुमती दिलेली असावी.’’ असे सांगून त्यांनी प्राथमिक विभागातील एका महिला कर्मचार्‍याला बोलावून घेतले आणि विचारणा केली असता त्या महिला कर्मचार्‍याने प्राथमिक विभागाकडून अनुमती दिल्याचे मान्य केले. यावर माध्यमिक शिक्षणाधिकारी शेख यांनी ‘अनुमती दिली असेल, तर ती रहित करण्याविषयी तुमच्या अधिकार्‍यांना सांगा’, अशी सूचना कर्मचार्‍याला केली, असे हिंदु जनजागृती समितीचे श्री. मुंज यांनी सांगितले.

प्राथमिक शिक्षणाधिकारी धोत्रे यांना निवेदन दिले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.