पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरण्याचा कट पूर्वनियोजित ! – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे

मुंबई – ‘शिवसेना’ हे नाव चोरले, तरी ते ‘ठाकरे’ हे नाव चोरू शकत नाहीत. मी बाळासाहेब आणि माँसाहेब यांच्या पोटी जन्माला आलो, हे माझे भाग्य आहे. हे भाग्य त्यांना देहलीवाले देऊ शकत नाहीत. पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरण्याचा हा कट पूर्वनियोजित होता, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २० फेब्रुवारी या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या गटावर केला. नुकतेच निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला दिले आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘ही परिस्थिती भविष्यात देशातील कोणत्याही पक्षावर आणली जाऊ शकते. असे झाल्यास वर्ष २०२४ मधील देशातील लोकशाहीतील शेवटची निवडणूक असू शकेल. त्यानंतर हुकूमशाहीचा नंगानाच पहायला मिळू शकतो. देशात अराजक आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांनी ठाकरे नाव काढून स्वत:चे किंवा स्वत:च्या वडिलांचे नाव लावून शिवसेना चालवून दाखवावी. त्यांनी पक्षादेश काढला, तर आम्हाला तो लागू होणार नाही; कारण निवडणूक आयोगाने २ गट मान्य केले आहेत. पक्षाचे सर्व व्यवहार आमच्याकडेच रहातील. निवडणूक आयोगाला याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार नाही. चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ चालू झाला आहे. जनतेला खरे हिंदुत्व कळावे, यासाठी ही घटना घडली. ५ मार्चपासून मी राज्यभर सभा घेणार आहे. अनेक अमराठी, मुसलमान आणि ख्रिस्ती नागरिकही माझ्या समवेत आहेत.’’