सातारा, १९ फेब्रुवारी (वार्ता.) – प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी २० फेब्रुवारीपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाणार आहेत. याविषयीचा निर्णय १७ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालयीन सेवक कृती समिती’च्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती ‘शिवाजी विद्यापीठ महाविद्यालयीन प्रशासकीय सेवक संघटने’चे अध्यक्ष चंद्रकांत धनवडे यांनी दिली.
चंद्रकांत धनवडे पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्र राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालयीन सेवक कृती समिती’ने २ फेब्रुवारीपासून प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विद्यापिठे आणि महाविद्यालयीन स्तरावर होणार्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. आतापर्यंत आंदोलनाचे २ टप्पे पूर्ण झाले आहेत. १५ फेब्रुवारी या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृती समितीचे पदाधिकारी यांच्यात मुंबई येथे बैठक झाली. बैठकीचे इतिवृत्त मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्याची भूमिका कृती समितीने घेतली आहे. उपमुख्यमंत्री कर्मचार्यांच्या ४ मागण्यांविषयी सकारात्मक आहेत; मात्र उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने दिलेल्या बैठकीचे इतिवृत्त विसंगत आहे. त्यामुळे आंदोलनाचा तिसरा टप्पा चालू करत २० फेब्रुवारीपासून सर्व अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांचे कर्मचारी अनिश्चित काळासाठी संपावर जात आहेत.
विद्यापीठ स्तरावर होणार्या परीक्षांवर परिणाम होण्याची शक्यता !
‘महाराष्ट्र राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालयीन सेवक कृती समिती’ने चालू केलेल्या संपामुळे विद्यापीठ स्तरावर होणार्या सर्वच परीक्षांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि शैक्षणिक वर्ष यांवरही होऊ शकतो. त्यामुळे ‘शासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांची संभाव्य हानी टाळावी’, अशी अपेक्षा विद्यार्थी आणि पालक व्यक्त करत आहेत.