संभाजीनगर येथे मद्यपी पोलीस उपनिरीक्षकांवर गुन्हा नोंद !

महिलांवर अश्लील शेरेबाजी !

संभाजीनगर – शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक अनिल बोडले यांनी मद्याच्या नशेत जवाहरनगर येथील एका सोसायटीमध्ये धिंगाणा घालून महिलांसमवेत अश्लील प्रकार केला. या प्रकरणी १६ फेब्रुवारी या दिवशी येथील जवाहरनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बोडले ज्या सोसायटीत रहातात, त्या ठिकाणी १६ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी मद्यधुंद अवस्थेत एका महिलेच्या घरावर १५ मिनिटे बॉल मारत राहिले. त्या महिलेने बाहेर येऊन जाब विचारताच तिला अश्लील शेरेबाजी केली, तसेच इतर महिलांनी त्यांना हटकले असता त्यांनाही शिवीगाळ करून पोलीस असल्याचे सांगत ‘बिनधास्त तक्रार करा, काही नाही होत’, असे उलट धमकावणे चालू केले.

अनेक दिवसांपासून रहिवाशांना धमकावत होते !

गेल्या अनेक मासांपासून बोडले अशा प्रकारे त्रास देतात, असे महिलांनी सांगितले. यापूर्वी त्यांनी अनेक महिलांसमवेत अपप्रकार केले आहेत; मात्र रहिवाशांनी त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु आता त्यांनी विकृतपणे वागत पोलीस अधिकारी असल्याचा दबाब टाकून रहिवाशांना धमकावणेही चालू केले. (असे पोलीस जनतेचे रक्षणकर्ते होतील का ? – संपादक)

काही मासांपूर्वीच त्यांना उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्यावर गंभीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिला आणि भाजप महिला पदाधिकारी यांनी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेतली. (गेल्या अनेक दिवसांपासून बोडले असे वागत असतांना त्यांच्यावर त्याचवेळी कारवाई का केली नाही ? वरिष्ठ पोलीस अधिकारी कनिष्ठ पोलीस अधिकार्‍यांवर लक्ष ठेवत नाहीत का ? – संपादक)