पुणे – महापालिका हद्दीतून फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे वगळण्याचा ठराव महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी सर्वसाधारण सभेत मान्य केला. राज्य सरकारच्या आदेशानुसार ही गावे महापालिकेतून वगळण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा समिती, सर्वसाधारण सभेत मान्य करून राज्य सरकारला पाठवण्यात आल्याचे समजते. राज्य सरकारकडून २२ वर्षांनी पुन्हा एकदा ही गावे हद्दीतून वगळण्याच्या निर्णयाचा परिणाम स्थानिक नागरिकांना भोगावा लागेल अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे.
फुरसुंगी आणि उरुळी देवाची या महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांची ‘स्वतंत्र नगर परिषद’ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यानुसार ही २ गावे महापालिकेतून वगळून त्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले होते. फुरसुंगी आणि उरुळी देवाची या ठिकाणी असलेल्या कचरा डेपोच्या जागेविना ही गावे वगळण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ही गावे महापालिकेतून वगळू नयेत, याकरता स्थानिक नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेण्याची सिद्धता केली असल्याचे समजते.