संग्रहालयाचे पावित्र्य नष्ट व्हावे, यासाठी कुणालाही अनुमती दिलेली नाही ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

आग्वाद किल्ला संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकान उघडल्याचे प्रकरण !

पर्यटनमंत्री रोहन खंवटे

पणजी – गोवा मुक्तीलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या आग्वाद किल्ला संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकाने उघडले असल्याने स्वातंत्र्यसैनिक संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्याकडून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी संग्रहालयाचे पावित्र्य नष्ट व्हावे, यासाठी सरकारने कुणालाही अनुमती दिलेली नसल्याचा दावा प्रसारमाध्यमांकडे केला.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले,

‘‘आग्वाद संग्रहालयाचे पावित्र्य नष्ट करणार्‍या कुठल्याही उपक्रमास सरकारने मान्यता दिलेली नाही. संग्रहालयात ‘फूड कोर्ट आणि तत्सम सेवा’ यांसाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. ‘जी-२०’ परिषदेसाठी येणारे प्रतिनिधीही या भागाला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर संग्रहालयाचे पावित्र्य टीकवले जाणार आहे. पाहुण्यांचे योग्य आदरातिथ्य करण्यासह प्रकल्पाच्या देखभालीसाठी महसूलाचे एक साधन निर्माण व्हावे, यासाठी एक ‘मॉडेल’ (नमुना) सिद्ध केला आहे.’’

(सौजन्य : Prudent Media Goa) 

अखिल गोवा स्वातंत्र्यसैनिक संघटनेने संग्रहालयातील मद्यविक्रीचे दुकान बंद न केल्यास सत्याग्रहाला आरंभ करण्याची चेतावणी दिली आहे.