वर्ष २०१९ ते २०२१ या काळात १ लाख १२ सहस्र कामगारांनी केल्या आत्महत्या !

केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव

नवी देहली – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालाचा हवाला देत केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव यांनी लोकसभेत माहिती देतांना सांगितले, ‘वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांत रोजंदारी करणार्‍या एकूण १ लाख १२ सहस्र कामगारांनी आत्महत्या केली. याच काळात ६६ सहस्र ९१२ गृहिणी, ५३ सहस्र ६६१ स्वयंरोजगार करणारे लोक, ४३ सहस्र ४२० पगारी नोकरदार, ४३ सहस्र ३८५ बेरोजगार, ३५ सहस्र ९५० विद्यार्थी आणि शेती क्षेत्राशी निगडित असलेले ३१ सहस्र ८३९ शेतीच्या संदर्भातील कामगार यांनीही आत्महत्या केलेल्या आहेत.’ देशासह जगभरात याच ३ वर्षांत कोरोनाचे संकट होते.

केंद्रीय मंत्री यादव यांनी ही माहिती देतांना सांगितले, ‘असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, २००८’नुसार सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी कटीबद्ध आहे. यामध्ये रोजंदारीवर काम करणारे कामगारही येतात. या कायद्यानुसार विम्याचे सरंक्षण, आरोग्याशी संबंधित कल्याणकारी योजना बनवणे आणि मातृत्वाच्या काळात लाभ देणे, वृद्धावस्थेतील सुरक्षा आणि केंद्र सरकारच्या इतर अनेक योजनांचे लाभ देण्याची तरतूद आहे.’

संपादकीय भूमिका 

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी समाजाला ‘जीवन कसे जगायचे ?’ आणि साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! हिंदु राष्ट्रात एकही आत्महत्या होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील !