मुंबई – मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईत मेट्रो, ट्रान्सहार्बर लिंक, रस्ते या पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. मार्च २०२४ पर्यंत मुंबईतील रस्ते सिमेंट-क्राँकीटचे करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून यासाठी ६५०० कोटी रुपयांचा निधी संमत केला आहे. मुंबई जोडणारे शहर असल्यानेे आंतरराष्ट्रीय नागरिक, उद्योजक मोठ्या संख्येने येत आहेत, यामुळे मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्याचा संकल्प केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दादर येथे ‘टी.व्ही. ९’च्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या विषयावरील राज्यस्तरीय परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.
श्री. शिंदे यांनी मांडलेली सूत्रे
१. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई अंतर ६ ते ७ घंट्यांवर येणार आहे. महामार्गांवर ३३ लाख वृक्ष लागवड करणार आहोत. सुमारे २५० ते ५०० मेगावॅट सोलर वीज सिद्ध करण्याचे उद्दिष्ट असून हा ग्रीन महामार्ग आहे.
२. मुंबईच्या सुशोभीकरणावर, कोळीवाड्यांचा विकास करण्यावर भर देण्यात येत असून शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबईतून रायगडला केवळ १५ मिनिटांत पोचणार आहोत. या ठिकाणचे ‘फ्लेमिंगो’ इथेच रहाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.
३. मुंबईहून पुण्याला घाटातून जातांना वाहतूक समस्या दूर करण्यासाठी जगातील सर्वात रूंद आठ ‘लेन’चा बोगदा सिद्ध करण्यात येणार आहे.
४. समृद्धी महामार्गाला गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड, जालना जोडण्यात येणार आहे. मुंबई-सिंधुदुर्ग हा मार्गही हाती घेण्यात येणार आहे. शेतकर्यांचा माल त्वरित मोठ्या बाजारपेठामध्ये पोचणार असून माल खराब होण्याची शक्यता अल्प होणार आहे
५. वर्सोवा-विरार सी-लिंक पॉईंटमुळे केवळ ४५ मिनिटांत विरारला पोचता येणार आहे. पालघरसह ग्रामीण भागापर्यंत विकास पोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ३३७ कि.मी. मेट्रोचे जाळे सिद्ध झाल्याने ६० ते ७० लाख कारचा वापर अल्प होईल.
६. मुंबईमध्ये ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ १०० ठिकाणी चालू केला आहे. २५० आणखी दवाखाने चालू करणार आहे.
७. १८ ते २० सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. यामुळे अडीच ते पाच लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यासाठी ‘नदी जोड प्रकल्प’ हाती घेत आहेे.
८. उद्योगांनी राज्यात यावे यासाठी त्यांना जलद गतीने अनुमती देण्यात येत आहे. सर्व सवलती देण्यात येत असून एक खिडकी योजनेतून सर्व प्रकारच्या अनुमती देत आहोत.