जात, धर्म यांच्‍या पलीकडे जाऊन देव, देश, गुरु, माता, पिता आणि समाज यांसाठी कार्य करा ! – अण्‍णासाहेब मोरे, अखिल भारतीय श्री स्‍वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख

श्री स्‍वामी समर्थ सेवा सत्‍संग आयोजित पुणे येथे महासत्‍संग सोहळा

‘अखिल भारतीय श्री स्‍वामी समर्थ गुरुपीठा’चे प्रमुख गुरुमाऊली परमपूज्‍य अण्‍णासाहेब मोरे यांच्या हस्ते मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार

मोशी (जिल्‍हा पुणे) – जाती आणि धर्म यांच्‍या पलीकडे जाऊन देव, देश, गुरु, माता, पिता आणि समाज यांसाठी निःस्‍वार्थीपणे कार्य केल्‍यास प्रत्‍येक घराघरात श्रावणबाळ आणि भक्‍त पुंडलिक सिद्ध होतील. सुखी आणि आरोग्‍यदायी जीवन जगायचे असेल तर न्‍यूनतम अपेक्षा, गरजा ठेवाल तर समाधानाने जीवन जगू शकाल, असे प्रतिपादन ‘अखिल भारतीय श्री स्‍वामी समर्थ गुरुपीठा’चे प्रमुख गुरुमाऊली परमपूज्‍य अण्‍णासाहेब मोरे यांनी केले. ‘श्री स्‍वामी समर्थ सेवा सत्‍संग आयोजन समिती’, पुणे यांच्‍या वतीने मोशी प्राधिकरण येथे ११ फेब्रुवारी या दिवशी परमपूज्‍य गुरुमाऊली श्री अण्‍णासाहेब मोरे यांच्‍या दिव्‍य सानिध्‍यात महासत्‍संग सोहळ्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍या वेळी ते बोलत होते. या वेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आळंदी देवस्‍थानचे प्रमुख विश्‍वस्‍त विकास ढगे, देहू देवस्‍थानचे प्रमुख विश्‍वस्‍त नितीन महाराज मोरे आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

या वेळी उपस्‍थित असलेले मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले की, खर्‍या अर्थाने मानवी जीवनाला परिपूर्ण करण्‍यासाठी अखिल भारतीय श्री स्‍वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख परमपूज्‍य आण्‍णासाहेब मोरे (गुरुमाऊली) हे आपल्‍या श्री स्‍वामी समर्थ गुरुपीठ संचलित सहस्रो सेवाकेंद्रांच्‍या माध्‍यमातून शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्‍कृतिक, आरोग्‍य, नोकरीविषयक अशा विविध क्षेत्रांमध्‍ये मोलाचे कार्य करत आहेत. आपल्‍या ज्ञानामुळे, भक्‍तीमुळे ज्‍या व्‍यक्‍ती थेट परमेश्‍वराशी मुक्‍त संवाद साधू शकतात यालाच ‘सत्‍संग’ असे म्‍हणतात. याही पलीकडे जाऊन हा संवाद जेव्‍हा समाजाच्‍या भल्‍यासाठी, तसेच उन्‍नतीसाठी साधला जातो त्‍यालाच महासत्‍संग म्‍हणतात.

लाखो सेवेकरी भक्‍तांच्‍या उपस्‍थितीमध्‍ये या वेळी श्री गणपती अथर्वशीर्ष पठण, सव्‍वा कोटी श्री प्रज्ञाविवर्धन स्‍तोत्र पठण आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्‍या अभंगांचे पठण करत आणि पसायदान म्‍हणून विश्‍वविक्रम करण्‍यात आला. लाखोंच्‍या संख्‍येने सेवेकरी उपस्‍थित असूनही सर्वत्र शिस्‍त, शांतता आणि भक्‍तीमय वातावरण दिसून येत होते. महाआरोग्‍य शिबिराच्‍या माध्‍यमातून गुरुपीठाच्‍या अनुमाने ३०० हून अधिक आधुनिक वैद्यांनी या ठिकाणी सहस्रों सेवकांची आरोग्‍य पडताळणी केली.