‘मुलीची साधना व्हावी’, यासाठी तिला सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असणार्‍या बार्शी, जिल्हा सोलापूर येथील सौ. राजश्री आगावणे !

१. देवाची ओढ

सौ. राजश्री आगावणे

आईची पूर्वीपासूनच देवावर श्रद्धा असून तिला अध्यात्माचीही आवड होती. आईला लग्नानंतर पुष्कळ कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले; परंतु त्या वेळीही तिची देवावरील श्रद्धा न्यून न होता, ती दृढ होत गेली.

२. सेवेची तळमळ

कु. मयुरी राजेंद्र आगावणे

माझी लहान बहीण विशाखा तिच्या जन्मानंतर काही मासांतच एका अपघातात विकलांग झाली. विशाखाला घरात एकटीला सोडून जाणे शक्य नसतांनाही आई तिला घरी ठेवून प्रतिदिन २ – ३ घंटे समष्टी सेवा करते. आई साधनेत आल्यापासून तिने प्रत्येक सेवा मन लावून केली आहे.

३. तत्त्वनिष्ठ आणि मुलीला योग्य दृष्टीकोन देऊन साधनेत आणणे

आई मला माझ्याकडून झालेल्या चुका तत्त्वनिष्ठतेने सांगते. पूर्वी आमच्यात मतभेद होते. नंतर तिने माझ्याकडे साधक म्हणून पहाण्यास आरंभ केला. तिने मला योग्य दृष्टीकोन देऊन मलाही साधनेत आणले. काही प्रसंगांमध्ये आईची चूक नसतांनाही ती माघार घ्यायची. काही वेळाने मला माझी चूक लक्षात आल्यावर ती मला समजावून सांगत असे.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा

४ अ. काही वेळा आमचे नातेवाईक आमच्या साधनेला विरोध करतात, तरीही आई त्यांचे मन जपत साधना करते. ‘गुरुमाऊली सर्व ठीक करील’, अशी तिची दृढ श्रद्धा आहे.

४ आ. ‘मुलीला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केल्यापासून तिची काळजी वाटत नाही’, असे सांगणे : मी कधी कधी आईला विचारते, ‘‘आई, यापुढे आपली भेट झाली नाही किंवा मला तुम्हाला बघता आले नाही किंवा मला घरी यायला मिळाले नाही, तर तुला चालेल का ?’’ त्या वेळी आई मला म्हणते, ‘‘तू साक्षात् देवाच्या चरणी, म्हणजे वैकुंठात आहेस. मला तुझी काळजी वाटत नाही. तू आनंदाने साधना कर. ‘तू देवाजवळ आहेस’, याहून माझ्यासाठी आनंदाची गोष्ट नाही.’’ नंतर आईने मला सांगितले, ‘‘वर्ष २००८ – २००९ मध्ये बार्शी येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी तू प्रथमच ‘वन्दे मातरम्’ म्हणत असतांनाच मी तुला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केले. तेव्हापासून मला तुझी काळजी वाटत नाही.’’

५. जाणवलेला पालट

५ अ. कुटुंबियांकडून अपेक्षांचे प्रमाण न्यून होणे : पूर्वी आईला बाबांकडून आणि माझ्याकडून पुष्कळ अपेक्षा असायच्या. बाबा साधना आणि नामजप करत नाहीत. त्यामुळे तिची चिडचिड होत असे; पण आता तिला आमच्याकडून कोणत्याही अपेक्षा नाहीत.

‘हे गुरुमाऊली, आईमधील गुण, गुरूंप्रतीचा भाव, गुरूंवरील दृढ श्रद्धा मलाही शिकता यावी’, अशी माझी गुरुमाऊलींच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– कु. मयुरी राजेंद्र आगावणे (सौ. राजश्री यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.२.२०२१)