राजापूर पत्रकार संघाच्या वतीने पोलिसांना निवेदन

  • पत्रकार शशिकांत वारीशे अपघाताचे प्रकरण

  • आरोपीला कठोर शिक्षा करा !  

राजापूर येथे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांना निवेदन देतांना राजापूर येथील पत्रकार

राजापूर, १० फेब्रुवारी (वार्ता.) – ६ फेब्रुवारी या दिवशी कोदवली पेट्रोलपंपाजवळ महेंद्रा थार गाडीने पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ते घायाळ झाले होते. त्यानंतर ७ फेबु्रवारीला त्यांचा कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार चालू असतांना मृत्यू झाला. या प्रकरणी वारीशे यांच्या नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त करून तशी तक्रार दिली आहे. या घटनेचा आम्ही सर्व पत्रकार राजापूर पत्रकार संघाच्या वतीने निषेध करत आहोत. या अपघात प्रकरणी थार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांची सखोल चौकशी करून दोषी आरोपीच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करावी आणि वारीशे कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

हे निवेदन राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांना पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र मोहिते यांनी दिले. या वेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ पत्रकार श्री. महेश शिवलकर, श्री. विनोद पवार, श्री. शरद पळसुलेदेसाई, श्री. भास्कर खडपे आणि अन्य पत्रकार उपस्थित होते.


वारीशे कुटुंबियांना मराठी पत्रकार परिषदेचे आर्थिक साहाय्य घोषित

मुंबई – चळवळीत काम करणारे आणि जनहितासाठी सर्वस्वाचे बलीदान देणारे दिवंगत पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने २१ सहस्र रुपयांचे साहाय्य देण्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस्.एम्. देशमुख यांनी केली आहे. शशिकांत वारिशे यांची हत्या झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा आधारच गेला आहे. अशा परिस्थितीत पत्रकार संघटना म्हणून कुटुंबियांच्या पाठीशी उभे रहाणे परिषदेला स्वत:चे कर्तव्य वाटते. एस्.एम्. देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी लवकरच राजापूर येथे जाऊन वारिशे कुटुंबियांची भेट घेणार आहेत.


पत्रकार शशिकांत वारीशे घातपातचा आमदार डॉ. राजन साळवी यांच्याकडून निषेध

राजापूर, १० फेब्रुवारी (वार्ता.) – तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघाती मृत्यू झाला नसून घातपाताची शक्यता असल्याने या घटनेविषयी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार डॉ. राजन साळवी यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

निषेध व्यक्त करतांना आमदार डॉ. राजन साळवी म्हणाले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून लोकशाही मार्गाने मांडलेल्या भूमिकेविषयी घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारे पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या गुन्हेगाराला पाठीशी न घालता कठोर कारवाई नक्कीच केली जाईल. तसेच सदर प्रकरणी पत्रकाराला न्याय मिळण्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्याची मागणी कलेली आहे.


हे ही वाचा – 

अपघात की हत्या ?

पत्रकारावरील आक्रमण ! (संपादकीय)
https://sanatanprabhat.org/marathi/653139.html