उपप्रादेशिक निरीक्षकासह २ दलालांना अटक !
नागपूर – येथे बायपासवर ट्रकचालकांकडून प्रवेश शुल्कच्या नावावर अवैध वसुली केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपप्रादेशिक परिवहन विभागातील (ग्रामीण) निरीक्षकासह २ दलालांना अटक केली आहे. निरीक्षक अभिजित मांढरे (वय ३९ वर्षे), दलाल करण काकडे (वय २८ वर्षे) आणि विनोद लांजेवार (वय ४८ वर्षे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्याच्या बायपासवरून जाणार्या ट्रकचालकांकडून ‘एंट्री’च्या नावावर होणार्या अवैध वसुलीच्या संदर्भात अनेक वेळा परिवहन आयुक्तांपासून तर मंत्र्यांपर्यंतही तक्रारी झाल्या आहेत; मात्र त्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेे ही कारवाई केली आहे. (परिवहन आयुक्तांकडे तक्रारी करूनही संंबंधित दोषी निरीक्षकांवर कारवाई का होत नाही ? तक्रारींची नोंद न घेणे म्हणजे ‘येथेे भ्रष्टाचार होत असून त्यामध्ये सर्व सहभागी आहेत’, असे नागरिकांनी समजायचे का ? तक्रारींची वेळीच नोंद घेऊन दोषींवर कारवाई न केल्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार वाढला आहे. – संपादक)
१. मांढरे हे ग्रामीण उपप्रादेशिक परिवहन विभागात कार्यरत असून त्यांची नियुक्ती कांद्री पडताळणी नाक्यावर होती. ३३ वर्षीय ट्रकचालक ८ फेब्रुवारी या दिवशी मनमाडहून रेवाकडे जात होता.
२. मांजरे यांच्या २ दलालांनी त्यांचे वाहन कांद्री नाक्यावर अडवले. त्याच्यावर बळजोरीने चलान कारवाई केली आणि ५०० रुपयांची ‘एंट्री’ शुल्कही मागितले. चलान असूनही पैसे मागितल्याने ट्रकचालकाने नकार दिला.
३. दोन्ही दलालांनी मांजरे यांच्या उपस्थितीत ट्रकचालकाला शिवीगाळ करून वाहन जप्त करण्याची धमकी दिली. बळजोरीने त्यांनी ५०० रुपये घेतले. काही अंतर गेल्यावर त्यांचा ट्रक खराब झाल्याने मालकाने ट्रक नागपूर येथे नेण्यास सांगितले. ट्रकचालक पुन्हा नागपूरच्या दिशेने वळला.
४. त्यानंतर त्या दलालांनी पुन्हा त्यांचे वाहन थांबवून प्रवेशासाठी ५०० रुपये मागितले. (भ्रष्ट प्रवृत्ती किती बळावली आहे, हे दिसून येते ! – संपादक) ट्रकचालकाने मालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यास सांगितले. तक्रारीनंतर पथकाने सापळा रचून पकडले.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचाराने पोखरलेला उपप्रादेशिक परिवहन विभाग ! |