सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांच्या मातोश्री श्रीमती सुमन हनुमंत गडकरी यांचे २१.११.२०२२ या दिवशी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्या साधिका श्रीमती प्रमिला पाटील (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ८० वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. अनेक वर्षांपासून गडकरीआजींशी परिचय असणे आणि त्यांच्या समवेत सेवाही करणे
‘माझा आणि कै. गडकरीआजींचा परिचय पुष्कळ जुना होता. सनातन संस्थेच्या आरंभीच्या काळात मी आणि आजी सांगली येथे होणार्या प्रशिक्षण वर्गांतील साधकांसाठी स्वयंपाक बनवण्याची सेवा करायचोे. मी प्रशिक्षण वर्गातील साधिकांसमवेत रहायचेे. त्या वेळी त्यासुद्धा माझ्याबरोबर रहात होत्या. नंतर काही वर्षांनी पूर्णवेळ साधनेसाठी गडकरीआजी देवद, पनवेल येथील आश्रमात आल्या आणि मला बघून म्हणाल्या, ‘‘इथेही आपले कुणीतरी आहे.’’ आश्रमात आम्ही दोघी एकाच खोलीत रहायला होतो.
२. मनमिळाऊ आणि कष्टाळू स्वभावाच्या आजी !
आजींचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्या पुष्कळ कष्टाळू होत्या. त्यांना कामाचा कधीच कंटाळा येत नसे. त्यांना स्वयंपाक करण्याची आवड होती. त्यांना इतरांना खायला घालायचा आवडायचे. त्या सर्वांमधे मिळून मिसळून जायच्या. लहानांसोबत लहान आणि मोठ्यांसोबत मोठ्या होऊन त्या त्यांच्यात मिसळायच्या. त्या मुलांची शिकवणी घ्यायच्या.
३. आजींना कुणी एखाद्या दुखण्याविषयी सांगितले की, त्या लगेच घरगुती उपचार सांगायच्या.
४ . सेवेची आवड
आजी आश्रमात शेवटपर्यंत सेवा करत होत्या. शेवटचे ४ मास त्यांच्या हातून सेवा झाली नाही, याची त्यांना खंत वाटायची. शेवटी शेवटी त्या पुष्कळ शांत झाल्या होत्या.
‘आजींसारखी मनमिळाऊ आणि सेवाभावी वृत्ती आम्हा साधकांमध्ये येऊ दे’, अशी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना ! हे सर्व गुरुमाऊलींनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) लिहून घेतले, त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्रीमती प्रमिला आदगौडा पाटील (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ८० वर्षे) सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.११.२०२२)