पुणे-नाशिक ‘हायस्‍पीड रेल्‍वे’ प्रकल्‍पामुळे दोन्‍ही शहरांच्‍या विकासाला चालना मिळणार ! – देवेंद्र फडणवीस

पुणे – भारतीय रेल्‍वे बोर्डाने मान्‍यता दिलेल्‍या पुणे-नाशिक सेमी हायस्‍पीड रेल्‍वे प्रकल्‍पाला ५ फेब्रुवारी या दिवशी केंद्रीय रेल्‍वेमंत्री अश्‍विनी वैष्‍णव यांनी मान्‍यता दिली. केंद्रशासनाच्‍या अंतिम संमतीसाठी हा प्रकल्‍प थांबला होता. आता संमती मिळाल्‍यामुळे लवकरच पुणे-नाशिक रेल्‍वे प्रवास जलद आणि सुखकर होणार आहे. माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी त्‍यांच्‍या खासदारकीच्‍या कार्यकाळात या रेल्‍वेमार्गाची संमती मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक माध्‍यमांवर पुणे-नाशिक हायस्‍पीड रेल्‍वे प्रकल्‍पाला तत्त्वतः मान्‍यता दिल्‍याविषयी केंद्रीय मंत्री अश्‍विनी वैष्‍णव यांचे आभार मानले आहेत, तसेच या प्रकल्‍पामुळे या दोन्‍ही शहरांच्‍या विकासाला मोठी चालना मिळेल, असे मतही व्‍यक्‍त केले आहे.

पुणे-नाशिक असा थेट रेल्‍वे मार्ग नसल्‍याने पुणे किंवा नाशिक गाठण्‍यासाठी मुंबईला येऊन रेल्‍वे पकडावी लागते. यासाठी ६ घंटे किंवा त्‍यापेक्षा अधिक वेळ लागतो. प्रवास वेळ अल्‍प करण्‍यासाठी रेल्‍वे मंत्रालयाने ‘हायस्‍पीड रेल्‍वे’ संकल्‍पना कार्यान्‍वित करण्‍याचा निर्णय घेतला आहे. हा रेल्‍वेमार्ग पुणे-नगर-नाशिक या

३ जिल्‍ह्यांना जोडणारा असल्‍याने या तिन्‍ही जिल्‍ह्यांच्‍या विकासाला चालना मिळणार आहे, तसेच शेतकर्‍यांना शेतमालाची ने-आण करण्‍याची मोठी सुविधाही यामुळे निर्माण होणार आहे.