(म्‍हणे) ‘लव्‍ह जिहाद’चे खोटे कारण पुढे करून आंतरधर्मीय विवाहांवर बंदी घालण्‍यासाठी कायदा करण्‍याचा घाट !’ – ‘सेक्‍युलर मूव्‍हमेंट’चा आरोप !

मुंबई – धर्मनिरपेक्ष तत्त्वाचा पुरस्‍कार आणि अंगीकार करणार्‍या राज्‍यघटनेने सामाजिक शांतता, कायदा अन् सुव्‍यवस्‍था, राष्‍ट्राची एकात्‍मता आणि आरोग्‍याची काळजी घेऊन प्रत्‍येक नागरिकाला धार्मिक स्‍वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिला आहे; परंतु कुठे गुन्‍हेगारी घटना घडली की, तिचे भांडवल करून ‘लव्‍ह जिहाद’सारख्‍या खोट्या गोष्‍टी पुढे करून आंतरधर्मीय विवाहावर बंदी घालण्‍यासाठी कायदे करण्‍याचा घाट रचला जात आहे, असा आरोप ‘सेक्‍युलर मूव्‍हमेंट आणि सेक्‍युलर आर्ट मूव्‍हमेंट’ संघटनेने केला आहे.

संघटनेने म्‍हटले आहे की, आंतरधर्मीय विवाहावर बंदी घालण्‍यासाठी वातावरण निर्मिती करण्‍यात येत आहे. महाराष्‍ट्रासह देशातील काही राज्‍यांमध्‍ये धर्मांतरबंदीचा कायदा करण्‍यासाठी मोर्चे निघत आहेत. हा कायदा करून नागरिकांच्‍या धार्मिक स्‍वातंत्र्यावर घाला घालण्‍याचा डाव आहे. आपल्‍या आयुष्‍याचा जोडीदार निवडण्‍याचे मूलभूत व्‍यक्‍तीस्‍वातंत्र्यही हिरावून घेतले जात आहे. त्‍याहीपेक्षा देशातील सामाजिक विषमता नष्‍ट करून समता प्रस्‍थापित करण्‍यासाठी राज्‍यघटनेचे शिल्‍पकार डॉ़. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्‍मक्रांती घडवून आणली. धर्मांतरबंदी कायदा करून धम्‍मक्रांतीचा पायाच उखडून टाकण्‍यासाठी २ सहस्र वर्षानंतर पुन्‍हा एकदा प्रतिक्रांती घडवून आणण्‍याचे हे षड्‌यंत्र आहे. आता सावध होणे आवश्‍यक आहे.

संपादकीय भूमिका 

‘लव्‍ह जिहाद’चे कारण खोटे आहे, असे म्‍हणणार्‍या ‘सेक्‍युलर मुव्‍हमेंट’ने आतापर्यंत देशात घडलेल्‍या अनेक प्रकरणांचा अभ्‍यास केल्‍यास त्‍यात ‘लव्‍ह जिहाद’च असल्‍याचे उघड होईल !