वर्धा, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – वर्धा जिल्ह्यातील लेखक आणि साहित्यिक यांना न्याय देण्यासाठी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये एक विशेष दालन उभारण्यात आले होते. या दालनामध्ये वर्धा जिल्ह्यातील विविध भागांतील ८४ लेखकांची २३५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
येथील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. तेथील ग्रंथ दालनामध्ये वर्धा जिल्ह्यातील साहित्यिक आणि लेखक यांना त्यांची पुस्तके ठेवता यावीत; म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात पुस्तके आणि ग्रंथ मागवण्यात आले होते. २८ जानेवारीपर्यंत त्यांना वर्धा जिल्ह्यातील ८४ लेखकांची २३५ पुस्तके प्राप्त झाली होती.