पुणे येथे ‘महिलांची असुरक्षितता आणि त्‍यावरील उपाय’ या विषयावरील व्‍याख्‍यानाला महिलांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

धर्मरक्षा समिती, हेल्‍थ कँप वस्‍ती, विश्‍व हिंदु परिषद आणि धर्मजागरण विद्यापीठ भाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने व्‍याख्‍यान

उपस्‍थित महिलांना मार्गदर्शन करतांना कु. क्रांती पेटकर

पुणे, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – धर्मरक्षा समिती, हेल्‍थ कँप वस्‍ती, विश्‍व हिंदु परिषद आणि धर्मजागरण विद्यापीठ भाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ४ फेब्रुवारी या दिवशी पांडवनगर भागातील मुली आणि महिला यांसाठी व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्‍या कु. क्रांती पेटकर यांनी उपस्‍थितांना ‘महिलांची असुरक्षितता, लव्‍ह जिहादचे संकट त्‍याची कारणे आणि त्‍यावरील उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले. याला महिलांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला. या व्‍याख्‍यानाला पुष्‍कळ महिला, युवती आणि पुरुष उपस्‍थित होते.

वैशिष्‍ट्यपूर्ण

१. व्‍याख्‍यान झाल्‍यावर एका जिज्ञासू महिलेने स्‍वतःहून येऊन सांगितले की, मी शिक्षिका आहे. मला याविषयी या आधी काहीच माहिती नव्‍हते; परंतु व्‍याख्‍यानातून मला पुष्‍कळ महत्त्वाची माहिती मिळाली. मी आज आले नसते, तर मला ही माहिती मिळाली नसती. मी यापुढे माझ्‍या संपर्कातील मुलींना याविषयी जागृत करण्‍याचा प्रयत्न करीन.

२. व्‍याख्‍यान झाल्‍यानंतर आयोजकांपैकी श्री. अमर वाबळे आणि त्‍यांच्‍या सहकार्‍यांनी सांगितले की, आमच्‍या भागात १८ गल्‍ल्‍या आहेत. या केवळ जवळच्‍या ४ गल्लीतील महिला होत्‍या. यापुढे आम्‍ही हेच व्‍याख्‍यान उर्वरित गल्लीतील महिलांना एकत्र करून त्‍यांच्‍यासाठीही घेऊ.

३. व्‍याख्‍यान झाल्‍यानंतर आयोजकांपैकी एकाने सांगितले की, माझ्‍या संपर्कातील एका ढोल पथकात मोठ्या संख्‍येने हिंदू युवती आहेत. मी त्‍यांच्‍यासाठी हे व्‍याख्‍यान आयोजित करण्‍याचा प्रयत्न करीन.

४. या वेळी लावण्‍यात आलेल्‍या हिंदु राष्‍ट्र विषयक ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादनांच्‍या कक्षालाही चांगला प्रतिसाद लाभला.