कु. मानसी तिरवीर यांना अधिवेशन कालावधीत सेवेला आलेल्‍या साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. वयस्‍कर साधकांनी स्‍वच्‍छतेच्‍या सेवेस होकार दिल्‍याने आश्‍चर्य वाटणे

‘रामनाथी येथे आयोजित केलेल्‍या ‘दशम् अखिल भारतीय अधिवेशना’मध्‍ये आश्रमसेवा आणि स्‍वच्‍छता यांच्‍या नियोजनाची सेवा माझ्‍याकडे होती. साधारण १५ ते २० साधक या सेवेसाठी आले  होते. त्‍यांपैकी जवळपास ८ जण वयस्‍कर साधक-साधिका होत्‍या. आश्रम सेवेत प्रामुख्‍याने भांडी घासणे आणि प्रसाधनगृहाची स्‍वच्‍छता करणे, अशा सेवा होत्‍या. मला आणि सहसाधिका यांना वाटले की, ‘हे वयस्‍कर साधक या सेवा करू शकतील का ?’  आम्‍ही त्‍यांना विचारले, ‘‘तुम्‍हाला शारीरिकदृष्‍ट्या ही सेवा जमेल ना ?’’ तेव्‍हा त्‍यांनी लगेच होकार दिला. ते म्‍हणाले, ‘‘काही अडचण नाही.’’ त्‍यांचे हे उत्तर ऐकून मला आश्‍चर्य वाटले.

२. ‘साधकांना आश्रम स्‍वच्‍छतेच्‍या सेवेतून आनंद मिळावा’, अशा प्रकारे सेवेचे नियोजन करणे

आम्‍ही आदल्‍या दिवशी या साधकांच्‍या सेवांचे नियोजन करायचोे आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ९ ते ९.३० पर्यंत एक बैठक घेऊन त्‍यांना सेवा सांगायचो. १५ ते २० मिनिटांत आमचे सेवेचे नियोजन सांगून व्‍हायचे. त्‍यानंतर उरलेल्‍या १० मिनिटांत ‘या सेवेतून त्‍यांना आनंद मिळावा’, यासाठी त्‍यांना प्रत्‍येक दिवशी सेवेच्‍या कालावधीत व्‍यष्‍टी साधनेचा एखादा प्रयत्न करण्‍यास सांगायचो, उदा. भाव ठेवून सेवा करणे, ‘एकमेकांकडून काय शिकायला मिळाले ?’, हे सांगणे; स्‍वयंसूचनासत्रे, प्रार्थना, कृतज्ञता, भावप्रयोग करणे इत्‍यादी. दुसर्‍या दिवशी ते याविषयीचा आढावा द्यायचे. आढावा देतांना त्‍यांची भावजागृती व्‍हायची. सर्व साधक भावपूर्ण सेवा करणारे होते. दिवसभर शारीरिक सेवा करूनही ते आनंदी होते. त्‍यांच्‍या आनंदात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. त्‍यांची जिज्ञासा, शिकण्‍याची वृत्ती आणि तळमळ वाढली. गुरूंप्रती त्‍यांच्‍या मनात पुष्‍कळ भाव होता.

३. सर्वांनी प्रसाधनगृहाची स्‍वच्‍छता भावपूर्ण करणे

ते साधक प्रसाधनगृहाची स्‍वच्‍छता पुष्‍कळ भावपूर्ण करायचे. ‘मला ही सेवा नको’ किंवा ‘मला ही सेवा करतांना किळस वाटते किंवा कंटाळा आला’, असा विचार त्‍यांच्‍या मनात येत नव्‍हता. चुकून असा विचार मनात आल्‍यास ते त्‍याला भावाची जोड देत. त्‍यामुळे तो विचार नष्‍ट होण्‍यास साहाय्‍य होई. ते स्‍वच्‍छता करतांना भजने म्‍हणत आणि जयघोष करत. त्‍यांना  कधीही ‘‘तुम्‍ही दमलात का ?’’, असे विचारले, तर ते ‘‘नाही ताई. आणखी काही सेवा आहे का ?’’, असे विचारायचे. त्‍यांची सेवेप्रतीची तळमळ बघून गुरूंप्रती कृतज्ञता वाटायची.

४. साधकांनी प्रसाधनगृहाची स्‍वच्‍छता करतांना ठेवलेले विविध भाव

अ. ‘आज प्रसाधनगृहात गुरुदेव येणार आहेत. लादीवर साबणचुरा अधिक राहिल्‍यास गुरुदेवांचा पाय घसरेल; म्‍हणून स्‍वच्‍छता नीट करायला हवी. असा त्‍यांनी भाव ठेवल्‍यानंतर अचानक कुणीतरी साधक प्रसाधनगृहात येऊन त्‍यांचे कौतुक करायचे. तेव्‍हा ‘गुरुच आले आहेत’, असे त्‍यांना वाटायचे.

आ. साधक प्रसाधनगृहाच्‍या स्‍वच्‍छतेच्‍या साहित्‍याशी बोलायचे. त्‍यांना प्रार्थना आणि कृतज्ञता व्‍यक्‍त करायचे, उदा. स्‍वच्‍छता झाल्‍यानंतर खराटा न धुता जागेवर ठेवल्‍यावर खराटा त्‍यांना म्‍हणायचा, ‘तुमची सेवा झाल्‍यावर तुम्‍ही तुमचे हात-पाय धुतलेत; परंतु माझी सेवा झाल्‍यावर मला धुतले नाही.’ मग ते परत खराटा धुऊन स्‍वच्‍छ करून ठेवायचे.

इ. काही वेळा ते ‘गुरूंच्‍या खोलीतील प्रसाधनगृहाची स्‍वच्‍छता करत आहोत’, असा भाव ठेवून ही सेवा करत. त्‍या वेळी ते ‘प्रसाधनगृहातील सगळ्‍या वस्‍तू गुरूंनी वापरलेल्‍या आहेत’, असा भाव ठेवायचे.

असे विविध भाव ठेवून स्‍वच्‍छतेची सेवा केल्‍यामुळे तेथे चैतन्‍य कार्यरत व्‍हायचे आणि इतरांनाही ते जाणवायचे. प्रतिदिनच्‍या बैठकीत त्‍यांनी सेवा करतांना ठेवलेले विविध भाव ऐकून सगळ्‍यांची भावजागृती व्‍हायची.

५. शिकायला मिळालेली सूत्रे

कु. मानसी तिरवीर

अ. ‘प्रसाधनगृहाच्‍या स्‍वच्‍छतेची सेवा भाव ठेवून केल्‍यास तिच्‍यातूनही आनंद अनुभवायला मिळू शकतो’, हे शिकायला मिळाले.

आ. त्‍यांच्‍यापैकी बहुतेक साधक वेगवेगळ्‍या जिल्‍ह्यांतून आले होते; पण त्‍यांची एकमेकांशी पुष्‍कळ जवळीक झाली होती. त्‍यांच्‍यामध्‍ये एकमेकांविषयीचा प्रेमभाव जाणवत होता. ते स्‍वतः एकमेकांची पुष्‍कळ काळजी घ्‍यायचे.

प.पू. गुरुदेवांप्रती त्‍या सर्वांमध्‍येच पुष्‍कळ भाव होता आणि या वैकुंठातील चैतन्‍याचा त्‍यांनी पुरेपूर लाभ करून घेतला. त्‍यांनी केलेल्‍या भावपूर्ण सेवेमुळे आश्रमातील प्रत्‍येक साधकाला ते चैतन्‍य अनुभवता आले.

‘गुरुकृपेने मला हे क्षण देवाने अनुभवायला दिले’, याविषयी कृतज्ञता !

६. अनुभूती

अ. एका प्रतिष्‍ठित पाहुण्‍यांना प्रसाधनगृहात गेल्‍यानंतर ‘तेथे पुष्‍कळ चैतन्‍य आहे’, असे जाणवले. त्‍यांनी प्रत्‍येक प्रसाधनगृह उघडून बघितले आणि ते म्‍हणाले, ‘‘इतक्‍या जणांनी हे प्रसाधनगृह वापरूनसुद्धा ते इतके स्‍वच्‍छ कसे काय ?’’ याविषयी त्‍यांना आश्‍चर्य वाटले आणि त्‍यांनीही या साधकांचे कौतुक केले.

आ. प्रसाधनगृहाचा वापर अधिक होत असल्‍याने दुर्गंध जाण्‍यासाठी आम्‍ही प्रसाधनगृहात ‘एअर फ्रेशनर’ (वायू-सुगंधक) ठेवत होतो. तेव्‍हा ते पाहुणे म्‍हणाले, ‘‘येथील प्रसाधनगृहातून इतका दैवी सुगंध येत असतांना तुम्‍ही ‘एअर फ्रेशनर’ का वापरत आहात ? हा दैवी सुगंध किती चैतन्‍यदायी आहे !’

इ. एकदा नकारात्‍मक स्‍थितीत असलेली एक साधिका त्‍या प्रसाधगृहात गेली. तिने पाहिले की, ‘स्‍वच्‍छतेची सेवा करणार्‍या साधिका भजन म्‍हणत सेवा करत आहेत.’ हे पाहून त्‍या साधिकेची नकारात्‍मकता दूर झाली. तिला तिकडे शांतता आणि चैतन्‍य अनुभवता आल्‍याने तिचा उत्‍साह वाढला.

सेवेला आलेल्‍या सर्व साधकांना या अनुभूती सांगितल्‍यावर त्‍यांची भावजागृती झाली. आमची प्रतिदिन होणारी बैठक, म्‍हणजे एक भावसत्‍संग असायचा. मला २० दिवस त्‍यांच्‍या सहवासात राहून त्‍यांच्‍याकडून पुष्‍कळ शिकायला मिळाल्‍याने गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. मानसी तिरवीर (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.७.२०२२)    

या अंकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीनुसार साधकांच्‍या वैयक्‍तिक अनुभूती आहेत. त्‍या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक