शिकण्‍याची वृत्ती आणि परात्‍पर गुरुदेवांप्रती अपार भाव असलेली पुणे येथील ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. प्रार्थना पाठक !

पुणे येथील ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. प्रार्थना पाठक (वय ११ वर्षे) हिला एकदा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग लाभला. त्‍या वेळी त्‍यांच्‍यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.

 सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कु. प्रार्थना पाठक

१. ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग हा दैवी खजिना आहे’, असा भाव असणारी कु. प्रार्थना पाठक !

कु. प्रार्थना पाठक : परम पूज्‍य, आपला सत्‍संग माझ्‍यासाठी ‘दैवी खजिनाच’ आहे. मला या सत्‍संगात शिकायला मिळालेली सूत्रे मी वहीत लिहिते. मी हा खजिना मनावर कोरून ठेवला आहे आणि या वहीत भरून ठेवला आहे. आपण सत्‍संगाला आल्‍यावर ‘हा खजिना आणि ही वही’ यांवर मला मराठीत पुढील कविता सुचली.

ही आहे दैवी तिजोरी, श्रीविष्‍णूच्‍या सत्‍संगाची ।
शब्‍दांचे माणिक-मोती भरूनी, सजवूया ही तिजोरी ॥

परात्‍पर गुरु डॉ. आठवले : शाब्‍बास ! ‘आध्‍यात्मिक कार्यक्रमात टाळ्‍या वाजवायच्‍या नाहीत’, असे मी सांगितले आहे; म्‍हणून मी टाळ्‍या वाजवत नाही, नाहीतर वाजवल्‍या असत्‍या. छान !

२. कु. प्रार्थनाने सत्‍संगात झालेल्‍या बोलण्‍याचे वर्गीकरण करून त्‍या संबंधीच्‍या रकान्‍यात लिहिणे

परात्‍पर गुरु डॉ. आठवले : तुझी वही दाखव. (परम पूज्‍यांनी असे सांगितल्‍यावर मी त्‍यांना वही दाखवली.) तू वहीत जे रकाने केले आहेस, त्‍याविषयी सर्वांना सांग.

कु. प्रार्थना पाठक : पहिल्‍या रकान्‍यात ‘साधक जे प्रश्‍न विचारतात किंवा सूत्रे सांगतात’ त्‍यांचे नाव आणि ‘ते काय म्‍हणाले ?’, हे मी लिहिले आहे. प.पू. गुरुदेवांनी त्‍या साधकाला केलेल्‍या मार्गदर्शनाविषयी दुसर्‍या रकान्‍यात लिहिले आहे आणि तिसर्‍या रकान्‍यात ‘मला त्‍यातून काय शिकायला मिळाले ?’, हे लिहिले आहे.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले : ‘असे लिहावे’, असे एका तरी मोठ्या व्‍यक्‍तीला सुचले आहे का ? (प.पू. गुरुदेवांनी ती वही सर्वांना दाखवली.)

३. प्रार्थनामध्‍ये भक्‍तीयोग आणि ज्ञानयोग यांचा सुरेख संगम असणे

एक साधिका : प्रार्थना ज्ञानयोगी आहे; म्‍हणून तिला असे सुचले असेल ना ?

परात्‍पर गुरु डॉ. आठवले : तिच्‍यात भावही आहे ना ! तिच्‍यात भक्‍ती आणि ज्ञान दोन्‍ही आहे. (प्रार्थनाला उद्देशून) अतिशय सुंदर !’

– कु. प्रार्थना पाठक, पुणे