भारतीय वंशाच्‍या गायींचे ‘जनुकीय क्रमनिर्धारण’ करण्‍यात भारतीय शास्‍त्रज्ञांना यश !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – देशी वंशाच्‍या ४  गायींचे प्रथमच ‘जनुकीय क्रमनिर्धारण’ करण्‍यात भारतीय शास्‍त्रज्ञांना यश आले आहे. भोपाळच्‍या ‘भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्‍थे’तील (आयसर) संशोधकांनी कासरगोड ड्‌वार्फ, कासरगोड कपिला, वेचूर आणि ओंगोल या गायींची अनुवंशिक संरचना जगासमोर ठेवली आहे. भारतीय देशी गायींमध्‍ये विशिष्‍ट क्षमता असून रोगप्रतिकारकशक्‍ती आणि दुधातील गुणधर्म यांमुळे गायीला महत्त्व आहे, असेही त्‍यांनी सांगितले. याविषयीची शोधपत्रिका ‘बायोआर्काईव्‍ह’मध्‍ये प्रकाशित केली आहे. डॉ. विनीत शर्मा यांच्‍या मार्गदर्शनाखाली अभिषेक चक्रवर्ती, मनोहर बिश्‍त, श्रुती महाजन आदींनी हे संशोधन केले.

जनुकीय क्रमनिर्धारण म्‍हणजे काय ?

सजीवांच्‍या अनुवंशिक घटकांचे एकक म्‍हणजे जनुके ! विशिष्‍ट जनुके गुणसूत्राच्‍या विशिष्‍ट भागावर असतात. एक गुणसूत्र म्‍हणजे डी.एन्.ए. (डीऑक्‍सिरिबो-न्‍यूक्‍लिईक आम्‍ल) याचा एक रेणू असतो. ‘डी.एन्.ए.’चा रेणू सहस्रो लहान रासायनिक एककांचा बनलेला असतो. या एककांना न्‍यूक्‍लिओटाईड म्‍हणतात. जनुकीय क्रमनिर्धारणात (जिनोम सीक्‍वेन्‍सिंग) ‘डी.एन्.ए.’चे प्रमुख घटक असलेल्‍या ४ प्रमुख रेणूंची क्रमवारी पडताळली जाते.