‘साधी रहाणी आणि उच्‍च विचारसरणी’ असलेल्‍या सनातनच्‍या १०९ व्‍या संत पू. (डॉ.) (श्रीमती) शरदिनी कोरे (वय ८० वर्षे) !

पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे

१. साधी रहाणी आणि शिस्‍तप्रिय

‘वर्ष २००३ मध्‍ये मी मिरज येथील सनातनच्‍या सेवाकेंद्रात ‘सूक्ष्म परीक्षण कसे करायचे ?’, हे शिकण्‍यासाठी गेले होते. तेव्‍हा मला पू. (डॉ.) (श्रीमती) शरदिनी कोरे यांच्‍याविषयी ठाऊक नव्‍हते. वैद्या माया पाटील यांनी माझी त्‍यांच्‍याशी ओळख करून दिली. तेव्‍हा त्‍यांच्‍याकडे पाहून ‘त्‍यांचे रहाणीमान साधे असून त्‍या शिस्‍तप्रिय आहेत’, असे माझ्‍या लक्षात आले.

सुश्री (कु.) कल्याणी गांगण

२. जवळीक साधणे

एक दिवस पू. कोरेकाकूंनी साधिकांना त्‍यांच्‍या खोलीत बोलावले होते. तेव्‍हा मला वाटले, ‘मी त्‍यांच्‍यापुढे काहीच नाही.’ ‘त्‍या माझ्‍यासारख्‍या सामान्‍य व्‍यक्‍तीला जवळ करतात’, हे पाहून मला प.पू. डॉक्‍टरांप्रती पुष्‍कळ कृतज्ञता वाटली.

३. वय अधिक असूनही सेवाकेंद्रातील कार्यपद्धतींचे पालन करणे आणि स्‍वावलंबी जीवन जगणे

पू. काकूंची रहाण्‍याची खोली आणि स्‍वयंपाकघर एकदम स्‍वच्‍छ असायचे. त्‍या वेळी त्‍यांचे वय ६० वर्षांच्‍या पुढे होते, तरीही त्‍या स्‍वतःची सर्व कामे स्‍वत: करायच्‍या. त्‍या सेवाकेंद्रातील सर्व कार्यपद्धतींचे पालन नियमित करत होत्‍या. त्‍या सर्व स्‍तरांवर स्‍वावलंबी जीवन जगण्‍याच्‍या प्रयत्न करत असत.

४. पू. डॉ. कोरेकाकूंचे कार्य आणि त्‍यांचा त्‍याग पाहून ‘त्‍यांची आध्‍यात्मिक पातळी चांगली असेल आणि त्‍या लवकरच संतपदी विराजमान होतील’, असे वाटणे

पू. कोरेकाकूंच्‍या रुग्‍णालयाच्‍या इमारतीत सनातनचे सेवाकेंद्र आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय होते. ती इमारत मोठी आहे. पू. काकू रुग्‍णालयाचे व्‍यवस्‍थापन आणि अन्‍य गोष्‍टी पहात असत. पू. काकूंचे कार्य आणि त्‍यांचा त्‍याग पाहून ‘त्‍यांची आध्‍यात्मिक पातळी चांगली असेल आणि त्‍या लवकरच संतपदी विराजमान होतील’, असे मला वाटलेे. (‘२१.८.२०२१ या दिवशी श्रीमती कोरेकाकू संतपदी विराजमान झाल्‍याचे घोषित करण्‍यात आले.’ – संकलक)

५. कोरे कुटुंबियांनी वारणानगर येथील दूध ‘फॅक्‍टरी’ची व्‍यवस्‍था चांगली ठेवली असणे

मी चवथ्‍या इयत्तेत शिकत असतांना आमच्‍या शाळेच्‍या सहलीच्‍या वेळी वारणानगर येथील दुधाची फॅक्‍टरी पाहिली होती. ती फार स्‍वच्‍छ होती. त्‍या वेळी ‘तिचे मालक कोण असतील आणि ते किती चांगले असतील !’, असे मला वाटले होते. मी मिरज आश्रमात रहायला गेल्‍यावर एकदा डॉ. कोरेकाकूंनी आम्‍हाला (मी, कु. माया पाटील आणि आश्रमातील काही साधक यांना) त्‍यांच्‍या वारणानगर येथील घरी बोलावले. तेव्‍हा डॉ. कोरे यांनी आम्‍हाला कोरे कुटुंबियांच्‍या मालकीची ती दुधाची ‘फॅक्‍टरी’ दाखवली. ती ‘फॅक्‍टरी’ मी चवथ्‍या इयत्तेत असतांना वयाच्‍या ९ व्‍या वर्षी जशी स्‍वच्‍छ पाहिली होती, तशीच ती वर्ष २००५ मध्‍ये स्‍वच्‍छ होती. तेव्‍हा मला त्‍या लहानपणीच्‍या प्रसंगाची आठवण झाली. कोरे कुटुंबियांनी ‘फॅक्‍टरी’ची व्‍यवस्‍था चांगली ठेवली आहे, याचे मला आश्‍चर्य वाटले.

६. कर्तेपणा न घेणे

त्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि वैद्या सुश्री (कु.) माया पाटील साधकांना ‘सूक्ष्म परीक्षण कसे करायचे ?’, हे शिकवत असत. पू. कोरेकाकू ‘आध्‍यात्मिक त्रास असणार्‍या साधकांसाठी नामजपादी उपाय कसे करायचे ?’, याची माहिती देत असत. त्‍या सांगायच्‍या, ‘‘मला यातील काहीच कळत नाही. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेनेच मी सांगू शकत आहे.’’

७. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या प्रती भाव

पू. काकूंच्‍या खोलीत गेल्‍यावर मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे अस्‍तित्‍व सतत जाणवत असे. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर तेथे प्रत्‍यक्ष आहेत’, असे मला जाणवायचे. ‘मला असे पू. काकूंमधील भावामुळे जाणवत आहे’, असे वाटत असे.

मला पू. कोरेकाकूंचा सहवास मिळाल्‍याबद्दल मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या चरणी कृतज्ञ आहे.’

– सुश्री (कु.) कल्‍याणी गांगण (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, वय ४२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१२.२०२२)


या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक