सोलापुरातील उजनीचा कालवा फुटल्याने शेकडो एकरातील पिके पाण्यात !

सोलापूर – मोहोळ तालुक्यातील उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतात पाणी गेल्याने शेतकर्‍यांची हाताशी आलेली पिके वाहून गेली आहेत, तर काही शेतकर्‍यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.

सौजन्य साम टीव्ही

उजनी धरणातून उजव्या कालव्यामध्ये ५०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग चालू होता. अनुमाने ११२ किलोमीटर लांब असलेला हा कालवा २९ जानेवारीच्या पहाटे पाटकूल गावात फुटला. त्यामुळे पाण्याचा मोठा ओढा शेतकर्‍यांच्या शेतात वाहू लागला. या शेतकर्‍यांची डाळिंब, ऊस यांसह सर्वच पिके पाण्याखाली गेली आहेत. ‘कालवा नेमका कसा फुटला ?’, हे अद्याप समजले नाही; मात्र प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना हानीभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.