दर्जेदार प्रयोगशाळेत चाचण्‍या करून घेण्‍याचे महत्त्व लक्षात घ्‍या !

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

१. दर्जाहीन ‘पॅथॉलॉजी लॅब’च्‍या अहवालामुळे रुग्‍णाच्‍या आजाराचे योग्‍य निदान न होणे

‘‘स्‍वस्‍तात तपासण्‍या करत आहात ? मग हे वाचून ठरवा !’’

‘‘डॉक्‍टर, अजूनही रक्‍तस्राव होतोच आहे. सतत पोटात दुखतंय..’’

‘‘मी तपासण्‍या करायला सांगितल्‍या होत्‍या. अहवाल आणले आहेत का ?’’

‘‘हो, केल्‍या आहेत ना..हे बघा..’’ अहवाल पाहून मी जरा वैतागलेच..!

‘‘अहो, मी तुम्‍हाला चांगल्‍या दर्जेदार प्रयोगशाळेत (लॅबमध्‍ये) चाचण्‍या करण्‍यास सांगितले होते. तुम्‍ही दर्जाहीन प्रयोगशाळेत चाचण्‍या केल्‍या, तर सगळे अहवाल ‘नॉर्मल’च येतात. मग आम्‍ही कोणतेही निदान करू शकत नाही.’’

मी बोलत असतांना रुग्‍णाच्‍या मुखावर झरझर पालटणारे भाव मी बघत होते. आधीच समाजात आधुनिक वैद्यांविषयी अपसमज पसरवण्‍यात धन्‍यता मानणारे काही लोक असतात. त्‍यामुळे ‘आधुनिक वैद्य आणि प्रयोगशाळा यांचे काहीतरी साटेलोटे असणार; म्‍हणून या असे सांगत आहेत’, असे भाव रुग्‍णाच्‍या चेहर्‍यावर होते. मी कोणत्‍याही रुग्‍णाला कायम त्‍यांच्‍या घराजवळ असलेल्‍या ४-५ दर्जेदार प्रयोगशाळांपैकी एक सुचवत असते. रुग्‍णाचे अहवाल व्‍यवस्‍थित यावेत, यासाठीच हा प्रयत्न केला जातो. मग असा अविश्‍वास दिसला की, प्रचंड मनःस्‍ताप होतो. खरेतर मनावर मोठ्या प्रयत्नाने संयम ठेवून मी औषधे लिहून दिली; पण रुग्‍णाला बरे काही वाटेना. ‘सोनोग्राफी’ केली, तर त्‍यात गर्भाशय आणि अंडाशय (ओवरी) या दोन्‍हींवर सूज होती; पण सूज येण्‍याचे कारण कळतच नव्‍हते.

शेवटी रुग्‍णाला उपरती झाली आणि तिने जवळच्‍या दर्जेदार प्रयोगशाळेत चाचण्‍या केल्‍या आणि अहवाल घेऊन आली. मी सांगितल्‍याप्रमाणे आधीचे अहवाल पूर्णपणे चुकीचे होते. रुग्‍णाला ‘थायरॉईड’ असून आणखी एका हॉर्मोन (संप्रेरक) ‘प्रोलॅक्‍टिन’ची पातळी बिघडली असल्‍यामुळे त्रास होत होता. त्‍याप्रमाणे औषधे चालू केली आणि साहजिकच थोड्या दिवसांत रुग्‍णाच्‍या प्रकृतीत पूर्णच फरक पडला. या तपासण्‍या आधीच योग्‍य ठिकाणी केल्‍या असत्‍या, तर वेळ, पैसा आणि मनःस्‍ताप तीनही गोष्‍टी वाचल्‍या असत्‍या. नाही का ?

२. चांगले नामांकन असलेल्‍या प्रयोगशाळेत तपासण्‍या करून घेणे आवश्‍यक !

सध्‍या स्‍वस्‍तात चाचण्‍या करणार्‍या प्रयोगशाळेचे पेवच फुटलेले आहे. यामध्‍ये आवश्‍यकता नसलेल्‍याही अनेक तपासण्‍या अगदी अल्‍प खर्चात केल्‍या जातात आणि सगळे अहवाल अगदी ‘नॉर्मल’ येतात. त्‍याने ‘रुग्‍ण आणि प्रयोगशाळेचे संचालक दोघेही ‘खूश’ अशी ही फसवी योजना असते. यात रुग्‍णाचे कोणतेच निदान होत नाही. या प्रयोगशाळांना कोणतेही योग्‍य मानांकन नसते. ‘एन्.ए.बी.एल्. अ‍ॅक्रेडिटेड’ (शासनमान्‍य) प्रयोगशाळेतच चाचण्‍या करून घेणे योग्‍य आहे. अशा प्रयोगशाळेच्‍या दर्जावर आम्‍हीही विश्‍वास ठेवू शकतो. दुसरे म्‍हणजे वाईट प्रवृत्तीची मूठभर माणसे वैद्यकीय क्षेत्रातही आहेत; पण सर्वांनाच त्‍याच पिवळ्‍या चष्‍म्‍यातून बघायचे ठरवले, तर आपलीच हानी होणार आहे. हे लक्षात घेतले पाहिजे.’

– डॉ. शिल्‍पा चिटणीस जोशी, स्‍त्रीरोग आणि वंध्‍यत्‍वतज्ञ, कोथरूड, पुणे. (२१.१.२०२३)