नागपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकार्‍याकडून सहकारी महिला अधिकार्‍याचा लैंगिक छळ !

महिला अधिकार्‍याची मोटर वाहन आयुक्‍तांकडे तक्रार !

नागपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकार्‍याकडून सहकारी महिला अधिकार्‍याचा लैंगिक छळ

नागपूर – येथील प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी रवींद्र भुयार यांच्‍याविरुद्ध महिला सहकारी अधिकार्‍याने मोटार वाहन आयुक्‍तांकडे लैंगिक छळाची तक्रार दिली आहे. पीडित महिला तक्रारदार वाहन मोटर निरीक्षक पदावर कार्यरत आहे. या प्रकरणी परिवहन आयुक्‍तांनी महिला तक्रार निवारण समितीच्‍या वतीने चौकशी करण्‍याचे आदेश दिले आहेत. परिवहन विभागाच्‍या अंतर्गत चौकशी चालू झाली आहे. रवींद्र भुयार यांची एका समितीसमोर सुनावणी होणार आहे. २७ जानेवारी या दिवशी ही समिती नागपूर येथे येणार असल्‍याचे समजते.

हिवाळी अधिवेशनाच्‍या काळात याविषयी समजताच भुयार यांचे गडचिरोली येथे स्‍थानांतर करण्‍यात आले होते. ते रहित करून त्‍यांची नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

महिलेच्‍या भावाने समज देऊनही सुधारणा नाही !

तक्रारदार महिला अधिकार्‍याने या संदर्भात स्‍वतःच्‍या मोठ्या भावाला माहिती दिल्‍याने त्‍याने रवींद्र भुयार यांना समज दिली होती. त्‍या वेळी भुयार यांनी ‘यापुढे असे कृत्‍य पुन्‍हा करणार नाही’, असे सांगितले. प्रत्‍यक्षात त्‍यांच्‍यात काहीच पालट झाला नाही. त्‍यामुळे महिलेने परिवहन आयुक्‍तांकडे तक्रार प्रविष्‍ट केली आहे.

तक्रारीत काय म्‍हटले आहे ?

परिवहन अधिकारी रवींद्र भुयार हे गेल्‍या वर्षभरापासून मला त्रास देत आहेत. मनात लज्‍जा निर्माण होईल, अशा पद्धतीने अश्‍लील भाषेत बोलून अवमानित करत आहेत. कोणतेही काम नसतांना रात्री विलंबापर्यंत कार्यालयात थांबवून ठेवणे, सतत आक्षेपार्ह टिप्‍पणी करणे, बाहेर फिरण्‍यासाठी समवेत येण्‍याची मागणी करत होते. एवढेच नाही, तर नेहमीच वाईट हेतूने वागून स्‍वतःच्‍या दालनात बोलावून अश्‍लील विनोद करत होते. आवश्‍यकता नसतांना ते माझ्‍या घरी येऊन बसायचे. रात्री विलंबापर्यंत ते जात नव्‍हते, असे गंभीर आरोप तक्रारीत करण्‍यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

विभागातील महिला अधिकार्‍यांशी वरिष्‍ठ अधिकार्‍याने असे वागणे, हे अनैतिकतेची परिसीमा गाठण्‍यासारखेच आहे. अशांचे केवळ स्‍थानांतर न करता त्‍यांना बडतर्फ करून त्‍यांच्‍यावर फौजदारी गुन्‍हा नोंद केला पाहिजे.