मराठी साहित्‍य संमेलन अजूनही अनुदानाच्‍या प्रतीक्षेत !

३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत वर्धा येथे ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन

  • मराठी भाषेच्‍या संदर्भात इतकी नियोजनशून्‍यता आणि ढिसाळपणा केला जाणे दुर्दैवी !
  • निमंत्रणपत्रिका अद्याप सिद्धच केलेल्‍या नाहीत !

वर्धा – येथे येत्‍या ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या ९६ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाची सिद्धता जोरात चालू आहे. हे संमेलन येथील स्‍वावलंबी विद्यालयाच्‍या मैदानात होणार आहे. संमेलनाला मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्‍येष्‍ठ नेते दत्ता मेघे यांची प्रमुख उपस्‍थिती असेल.

संमेलनासाठी प्रचंड व्‍यय अपेक्षित आहे; परंतु अद्याप राज्‍यशासनाकडून संमेलनासाठी घोषित केलेले ५० लाख रुपयांचे अनुदानच प्राप्‍त झालेले नाही. या संदर्भात बोलतांना महामंडळाच्‍या अध्‍यक्षा उषा तांबे यांनी अनुदानासाठी पाठपुरावा चालू असल्‍याचे सांगितले.

संमेलनाच्‍या निमंत्रणपत्रिकेला विलंब !

संमेलन अगदी जवळ येऊन ठेपले असतांना संमेलनाची निमंत्रणपत्रिका सिद्ध झालेली नाही. या संदर्भात विदर्भ साहित्‍य संघाचे कार्याध्‍यक्ष रवींद्र शोभणे यांनी सांगितले, ‘‘संमेलनाची निमंत्रणपत्रिका २२ ते २४ जानेवारीपर्यंत छापून येईल. त्‍यानंतर ती सर्वांना पाठवण्‍यात येईल. पत्रिका पोचण्‍यास लागणारा वेळ गृहित धरता ‘पी.डी.एफ्.’ पाठवण्‍यात येईल. काही पाहुण्‍यांच्‍या उपस्‍थितीविषयी निश्‍चिती झाली की, त्‍वरित पत्रिका सिद्ध होईल.’’

संमेलनाची सिद्धता !

संमेलनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी मैदानात विविध आकाराचे एकूण ५ सभामंडप उभारले जात आहेत. मुख्‍य सभामंडपात ७ सहस्र ५०० आसंद्या रहातील, तर अन्‍य मंडपांमध्‍ये रसिकांना बसण्‍यासाठी २ सहस्र आसंद्या ठेवल्‍या जाणार आहेत.

३५० नामवंत साहित्‍यिक, विचारवंत आणि लेखक यांना निमंत्रण ! 

या कार्यक्रमांमध्‍ये पाहुणे, वक्‍ते, नामवंत साहित्‍यिक, विचारवंत, लेखक आदी ३५० जणांना निमंत्रित करण्‍यात आले आहे. त्‍यांचे निवास आणि भोजन यांची व्‍यवस्‍था आयोजकांच्‍या वतीने विनामूल्‍य केली जाईल.