एस्.टी. महामंडळात ५ सहस्र ३०० नवीन वातानुकूलित इलेक्‍ट्रिक गाड्या येणार !

श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई

मुंबई, १९ जानेवारी (वार्ता.) – राज्‍यात एस्.टी. महामंडळामध्‍ये नवीन ५ सहस्र ३०० वातानुकूलित इलेक्‍ट्रिक गाड्या येणार आहेत. ऑक्‍टोबर ते डिसेंबर २०२३ पर्यंत ७०० गाड्या येतील. त्‍यानंतर टप्‍प्‍याटप्‍प्‍याने गाड्या येतील, अशी माहिती महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या वाहतूक विभागाचे महाव्‍यवस्‍थापक शिवाजी जगताप यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या प्रतिनिधीला दिली.

या गाड्यांच्‍या चार्जिंगसाठी राज्‍यात विविध ठिकाणी १७० केंद्रे उभारण्‍यात येणार आहेत. यांतील ९ केंद्रे सिद्ध झाली असून ३ केंद्रे प्रक्रियेत आहेत. गाड्या वातानुकूलित असल्‍या, तरी गाड्यांच्‍या तिकिट दरामध्‍ये वाढ करण्‍यात येणार नाही. एस्.टी. महामंडळाचे उत्‍पन्‍न वाढावे, यासाठी विविध उपाययोजना राबवण्‍यात येत आहेत. एस्.टी. महामंडळाची बसस्‍थानकांची स्‍वच्‍छता मोहीम त्‍याचाच भाग आहे, अशी माहिती शिवाजी जगताप यांनी दिली.