वर्ष २०११ मधील साखळी बाँबस्फोटाचे प्रकरण
मुंबई – वर्ष २०११ मध्ये येथे झालेल्या साखळी बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी नदीम अख्तर अधिवक्ता होऊ शकणार आहे. त्याचा ‘महाराष्ट्र बार काऊन्सिल’मधील सहभाग निश्चित होत असल्याचे समजते. तो बाँबस्फोटप्रकरणी गेल्या १० वर्षांपासून कारागृहात आहे. त्याला ‘विशेष ट्रायल कोर्टा’ने ‘महाराष्ट्र बार काऊन्सिल’च्या सदस्यत्वासाठी अर्ज करण्याला आणि त्याच्याकडून त्याच्या चुलत भावाद्वारे अधिकार पत्र सोपवण्याला अनुमती दिली आहे.
अटकेत असतांनाच नदीमने मुंबई विद्यापिठातून एल्.एल्.बी.ची पदवी पूर्ण केली. अधिवक्ता होण्याला न्यायालयाकडूनच अनुमती मिळू शकते, असे मुंबई आतंकवादविरोधी पथकाने सांगितले होते. न्यायालयानेही यासाठी नदीमला अनुमती दिली. या प्रकरणी कायदा आणि नियम यांचे पालन केले जाईल, असे विशेष न्यायाधिशांनी त्यांच्या आदेशामध्ये सांगितले.
१३ जुलै २०११ या दिवशी ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि दादर येथील कबुतरखाना येथे बसस्थानकाच्या ठिकाणी बाँबस्फोट झाले होते. यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला, तर १३० जण घायाळ झाले.