काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते सुनील केदार यांना न्‍यायालयाकडून १ वर्ष कारावासाची शिक्षा !

महावितरणच्‍या अधिकार्‍यांना मारहाण केल्‍याचे प्रकरण

नागपूूर – वर्ष २०१७ मध्‍ये माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते सुनील केदार यांनी आंदोलनाच्‍या वेळी महावितरणच्‍या अधिकार्‍यांना मारहाण केली होती. या प्रकरणी जिल्‍हा न्‍यायालयाने सुनील केदार यांना १ वर्ष कारावासाची शिक्षा आणि १४ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्‍यायालयाने सुनील केदार यांच्‍यासह अन्‍य तिघांनाही शिक्षा सुनावली आहे. ‘या विरोधात उच्‍च न्‍यायालयात अपील करण्‍यात येईल’, असे केदार यांनी सांगितले.


काय आहे प्रकरण ?

वर्ष २०१७ मध्‍ये तेलगाव येथील शेतकरी हबीब शेख आणि महावितरणचे अधिकारी यांच्‍यात विद्युत्‌वाहिनी टाकण्‍यावरून वाद झाला होता. अदानीची टॉवर लाईन शेतकर्‍यांच्‍या शेतातून जात होती; मात्र अदानी हानीपेक्षा अल्‍प मोबदला देत असल्‍यामुळे शेतकर्‍यांमध्‍ये रोष होता. वाद मिटवण्‍यासाठी सुनील केदार आपल्‍या समर्थकांसह गावात पोचले होते. त्‍यांच्‍यासमवेत वैभव घोंगे, मनोहर कुंभारे आणि दादाराव देशमुख होते. या वेळी केदार यांनी महावितरणच्‍या अधिकार्‍यांना मारले होते. त्‍या विरोधात अधिकार्‍यांनी सरकारी कामात अडथळा आणल्‍याच्‍या कारणावरून केळवद पोलीस ठाण्‍यात केदार यांच्‍या विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम ३५३ नुसार गुन्‍हा नोंद केला होता.

संपादकीय भूमिका 

अधिकार्‍यांना मारहाण करणारे पदाधिकारी असणारी काँग्रेस सत्तेत आल्‍यास गुंडशाहीचाच अनुभव देणार, हे जनतेने ओळखावे !