संस्‍कृत भाषा ही भारतीय संस्‍कृतीचा पाया आहे ! – जयश्री साठे, ज्‍येष्‍ठ संस्‍कृत प्राध्‍यापिका

पुणे – संस्‍कृत भाषा अतिशय समृद्ध आहे. या भाषेमध्‍ये अपार ग्रंथसंपदा आहे. संगीत, नाट्य या कला संस्‍कृत साहित्‍याने समृद्ध आहेत. संस्‍कृत भाषा ही भारतीय संस्‍कृतीचा पाया आहे. त्‍यामुळे संस्‍कृतचा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार व्‍हायला हवा, असे मत ज्‍येष्‍ठ संस्‍कृत प्राध्‍यापिका जयश्री साठे यांनी ९ जानेवारी या दिवशी केले. त्‍या सांस्‍कृतिक कार्य संचालनालयाच्‍या वतीने आयोजित ६१ व्‍या ‘संस्‍कृत राज्‍य नाट्य स्‍पर्धे’च्‍या पुणे केंद्रावरील अंतिम फेरीच्‍या उद़्‍घाटनप्रसंगी बोलत होत्‍या.

‘संस्‍कृत राज्‍य नाट्य स्‍पर्धे’च्‍या पहिल्‍या दिवशी चिंचवडच्‍या ‘व्‍ही.के. माटे हायस्‍कूल’चे ‘मेलनं इतिहासेन सहा !’ तर ‘स.प. महाविद्यालया’चे ‘संङ्‌गीत सौभद्रम् !’ ही २ नाटके सादर करण्‍यात आली. १४ जानेवारीपर्यंत प्रतिदिन सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत कोथरूड येथील यशवंतराव चव्‍हाण नाट्यगृहात या फेरीतील नाटकांचे सादरीकरण होणार आहे.