मुंबई – भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी देवेन भारती यांनी ५ जानेवारी या दिवशी मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. मुंबईच्या इतिहासात प्रथमच विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने ४ जानेवारी या दिवशी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त पदासाठी देवेन भारती यांची घोषणा केली होती. पदभार स्वीकारण्यापूर्वी देवेन भारती यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि कायदा अन् सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांची भेट घेतली. यापुढे सर्व सहपोलीस आयुक्त हे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांना रिपोर्ट करतील आणि विशेष पोलीस आयुक्त हे पोलीस आयुक्तांना रिपोर्ट करतील.
देवेन भारती हे वर्ष १९९४ च्या शाखेचे अधिकारी आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांच्यावर पोलीस सहआयुक्त म्हणून कायदा आणि सुव्यवस्था यांचे दायित्व होते. त्यानंतर त्यांना आतंकवादविरोधी पथकाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बढती मिळाली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक करण्यात आले होते.