वरील प्रश्न वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील, परंतु हे खरे आहे. त्यामागील अध्यात्मशास्त्र खालील प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून आपणास लक्षात येईल.
प्रश्न : पंचायतन देवतांविषयी देवघरातील मांडणी कशी करावी ? कुलदेवतेच्या मूर्तीची मांडणी करतांना श्री गणेशाची मूर्ती मध्ये ठेवणे आवश्यक आहे का ?
उत्तर : आपल्याकडे एक वेड्यासारखी पद्धत आहे. कोणी गावी किंवा तीर्थक्षेत्री गेले की, तेथून देवतेच्या मूर्ती अथवा प्रतिमा आणून सर्व नातेवाईक, शेजारीपाजारी यांना वाटतात. आपण त्या मूर्ती देवघरात ठेवून देतो.
एका जिल्ह्यात सत्संगाला येणार्या एक महिलेचे सात घंटे केवळ पूजा करण्यात जायचे. रात्री दोन वाजता उठून तिला हे सर्व करावे लागे, तेव्हा कुठे ९ वाजेपर्यंत सर्व आटपायचे. यामध्ये धार्मिकता, श्रद्धा, भाव काहीच येत नाही. आपल्या दृष्टीने दोन-चार देवच महत्त्वाचे आहेत. त्यांचीच प्रतिमा किंवा मूर्ती देवघरात ठेवावी. कुलदेव आणि कुलदेवी, लग्नाच्या वेळेस माहेरहून आणलेली अन्नपूर्णेची मूर्ती, काही कुळात मारुति असतो तो एक. असे दोन-चार देव पुरे झाले. आधीच्या पिढीच्या अन्नपूर्णा देवघरात ठेवण्याची आवश्यकता नाही; कारण अन्नपूर्णा हे तत्त्व आहे. अनेकातून एकात जायचे, हा साधनेतील पहिला नियम आहे.
‘मुंबईतील एका डॉक्टर मित्रांनी मला (सनातन संस्थेचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना) एकदा घरी बोलावले. त्यांच्या घरात आल्यावर त्यांना म्हटले, ‘‘ही तुमची मधली खोली आहे ना, तिच्या त्या टोकाला काहीतरी वाईट जाणवत आहे.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘अहो डॉक्टर, असे काय म्हणता, तिकडे तर आमचे देवघर आहे.’’ आतमध्ये जाऊन पाहिले, तर त्या ठिकाणी २५ – ३० देवतांच्या मूर्ती आणि प्रतिमा ठेवल्या होत्या. जेथे देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा आहे, तेथे त्या देवतेचे ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि शक्ती’ हे एकत्र असतात. आपणा सर्वांना केवळ शब्द आणि रूप ठाऊक असते. देवतेची आपण उपासना करत गेलो, नाम घेत गेलो की, तिचे दर्शन होते. ज्यांनी पदार्थविज्ञानाचा अभ्यास केला आहे, त्यांना प्रत्येक वस्तूमध्ये असणार्या शक्तीविषयी माहिती असते. दोन शक्ती एकत्र आल्या की, त्यांचा परिणाम होऊन काहीतरी नवीन शक्ती निर्माण होते. त्या देव्हार्यात अनेक देव कसेही ठेवल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून त्रासदायक शक्ती निर्माण झाली होती. देवघरातील अतिरिक्त देव काढून ते इतरांना किंवा जवळच्या देवळांत द्यावेत किंवा विसर्जन केले, तरी काही बिघडत नाही.
शंकराचार्यांनी ज्या काळात पंचायतन आणले, त्याच काळात गणपतीसुद्धा आणले. पूर्वी शैव आणि वैष्णव या दोन संप्रदायांत पुष्कळ भांडणे आणि मारामार्या होत असत. तेव्हा त्यांचा समन्वय साधला जावा; म्हणून शंकराचार्यांनी शंकर आणि विष्णु यांना डावलून गणपतीला पहिला मान देण्याचे निश्चित केले.
आपण बोलतो, ती नाद भाषा. देवांची प्रकाश भाषा असते. गणपतीला या दोन्ही भाषा येतात; म्हणून गणपति ‘दुभाषा’चे काम करतो. व्यासांना पुराण लिहायचे होते. त्या वेळी ते विचारांच्या पातळीला सुचणार असल्याने विचारांच्या गतीला ग्रहण करून त्याच गतीने लिहिले जाणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी गणपतीची निवड केली होती.
मानसिकदृष्ट्या पंथांचे एकत्रीकरण आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रकाश आणि नाद भाषेचे रूपांतर करणे, या दोन्ही गोष्टींमुळे गणपतीला देवघरात मध्यभागी स्थान देण्यात आले. गणपतीच्या उजव्या बाजूला पुरुषवाचक देव, उदा. कुलदेव, मारुति आणि डावीकडे स्त्रीवाचक देव, उदा. कुलदेवी, अन्नपूर्णा.
पूजेच्या वेळेस पुरोहित कधी सांगतात पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला बसावे, तर कधी उजव्या बाजूला बसण्यास सांगतात. उपासनेसाठी शक्ती हवी असल्यास पत्नीला उजव्या बाजूला बसवतात आणि शक्ती विरहित पूजा करायची असेल, तेव्हा पत्नीला डाव्या बाजूला बसवले जाते. शक्ती संप्रदायात याच्या पूर्णपणे उलट मांडणी असते. आपण सर्व भक्तीमार्गानुसार साधना करणारे आहोत. त्यात आपल्याला शक्ती नको. आपल्याला शक्ती नष्ट करून शिवाची अनुभूती घ्यायची आहे; म्हणून आपण पुरुषवाचक देव आपल्या डावीकडे आणि स्त्रीवाचक देवी आपल्या उजवीकडे ठेवतो.
(अध्यात्मातील सैद्धांतिक भागाचा कितीही अभ्यास केला, तरी मनातील शंकांचे निरसन झाले नाही तर साधना नीट होत नाही. या दृष्टीने गांवोगांवच्या जिज्ञासू आणि साधकांच्या मनात सर्वसाधारणपणे उद्भवणार्या अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे. याचा अभ्यास करून अधिकाधिक जिज्ञासूंनी योग्य साधनेला आरंभ करावा आणि जीवनाचे खर्या अर्थाने सार्थक करून घ्यावे, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !)
साभार : ‘सनातन संस्थे’चे संकेतस्थळ Sanatan.org (सनातन डॉट ऑर्ग)
#devghar, #देवघर, #देवता, #देवतांची_मांडणी, देवतांची मांडणी, देवघर, devghar