म्हादई प्रश्नावरून तृणमूलचा मोर्चा, तर ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ची राज्यव्यापी आंदोलनाची चेतावणी

गोव्याची जीवनदायिनी ‘म्हादई नदी’

पणजी, ४ जानेवारी (वार्ता.) – म्हादईचे पाणी कळसा-भंडुरा प्रकल्पाच्या माध्यमातून मलप्रभेत वळवण्याच्या कर्नाटकच्या प्रस्तावाच्या ‘सविस्तर प्रकल्प अहवाला’ला (डी.पी.आर्.) केंद्राने मान्यता दिल्याने विविध राजकीय पक्ष आणि पर्यावरणप्रेमी संस्था यांनी आंदोलन छेडले आहे.

केंद्राने कळसा आणि भंडुरा या प्रकल्पांना दिलेली मान्यता मागे घ्यावी, या मागणीवरून तृणमूल काँग्रेसने ४ जानेवारी या दिवशी पणजी येथे आझाद मैदानात निषेध मोर्चा काढला, तर १६ जानेवारीपर्यंत केंद्राने प्रकल्पाला दिलेली मान्यता रहित न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची चेतावणी ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ या संघटनेने दिली आहे.

‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’चे अधिवक्ता हृदयनाथ शिरोडकर म्हणाले, ‘‘१६ जानेवारी हा दिवस जनमत कौल दिवस म्हणून पाळला जातो. याच दिवशी आता म्हादई वाचवण्यासाठी लढा द्यावा लागणार आहे. १६ जानेवारीपर्यंत केंद्राने प्रकल्पाला दिलेली मान्यता रहित न केल्यास म्हादई वाचवण्यासाठी सर्व गोमंतकियांनी रस्त्यावर उतरावे.’’