‘हैद्राबाद बुक फेअर’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथे प्रतिवर्षीप्रमाणे २२ डिसेंबर  २०२२ ते १ जानेवारी २०२३ या कालावधीत ३५ वे ‘हैद्राबाद बुक फेअर’चे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी लावण्यात आलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनस्थळी लावण्यात आलेल्या धर्मशिक्षण फलकांनी सहस्रो लोकांचे लक्ष वेधून घेतले. सर्वजण प्रदर्शनाच्या ठिकाणी उभे राहून सर्व फलक वाचल्यावरच पुढे जात होते. या पुस्तक जत्रेमध्ये एकूण ३२० स्टॉल्स लावण्यात आले होते.

सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी ग्रंथ पहातांना जिज्ञासू

क्षणचित्रे

१. सनातन संस्थेच्या प्रदर्शनाचे एका ‘यु ट्यूब’ वाहिनीच्या प्रतिनिधीने चित्रीकरण करून त्याचे प्रसारण केले. त्यात अधिकाधिक लोकांनी संस्थेच्या प्रदर्शनाला भेट देण्याविषयी आवाहन करण्यात आले. त्यामुळे अनेक जिज्ञासूंनी गंथ आणि सात्त्विक वस्तू खरेदी करण्यात रस दाखवला.

२. प्रदर्शनातील सात्त्विक उत्पादनांचा सुगंध जिज्ञासूंना प्रदर्शनाकडे आकर्षित करत होता.

३. सनातन संस्थेच्या बाजूच्या स्टॉलवरील व्यक्तीने साधकांना विचारले की, ते सर्व एकाच कुटुंबातील आहेत का ? येथील सर्व साधकांचेच चित्र ग्रंथावर छापले आहेत, असे त्यांना वाटत होते. यातून सनातनच्या साधकांमध्ये असलेली कौटुंबिक भावना इतरांच्याही लक्षात येत असल्याचे लक्षात आले.