‘सम्मेद शिखरजी’ला धार्मिक स्थळाचा दर्जा द्या, या मागणीसाठी कोल्हापूर येथे जैन समाजाचा मोर्चा !

जैन समाजाने कोल्हापूर येथे काढलेला मोर्चा

कोल्हापूर – झारखंड सरकारने जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘सम्मेद शिखरजी’ला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. तरी तो रहित करून ‘सम्मेद शिखरजी’ला धार्मिक स्थळाचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी येथे जैन बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोच्र्याचे नेतृत्व स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वाजी, स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी केले. निर्णय न पालटल्यास देहलीत मोठा मोर्चा काढण्याची चेतावणी या वेळी देण्यात आली.

जैन समाजाने कोल्हापूर येथे काढलेला मोर्चा

केंद्र सरकारच्या पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने पारसनाथ पर्वताला अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या पर्वताच्या आजूबाजूला संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे पारसनाथ अभयारण्य हे जैन धर्माचे पवित्र स्थळ आहे. आता तेथे उपाहारगृह आणि ‘रिसॉर्ट’ चालू करण्यास अनुमती दिल्याने तेथील पावित्र्य नष्ट होईल. तरी सम्मेद शिखरजीला धार्मिक स्थळाचा दर्जाच मिळणे आवश्यक आहे.

जैन समाजाने कोल्हापूर येथे काढलेला मोर्चा

या प्रसंगी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, इचलकरंजी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, खासदार धैर्यशील माने, दक्षिण भारत जैन सभेचे माजी सदस्य पद्माकर कापसे, राहुल चव्हाण, संजय शेटे, सुनील पाटील यांसह जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.