पाकिस्तान आतंकवाद्यांची भरती केंद्रे आणि अड्डे चालवत आहे ! – एस्. जयशंकर

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

व्हिएन्ना (आस्ट्रिया) – पाकिस्तान हाच तो देश आहे, ज्याने आमच्या देशातील संसदेवर आक्रमण केले. हा तोच देश आहे, ज्याने आमच्या मुंबईवर आतंकवादी आक्रमण केले. हा तोच देश आहे, जो आमच्या देशातील हॉटेल्स आणि पर्यटनस्थळे यांना लक्ष्य करतो, जो प्रतिदिन घुसखोरांना आतंकवादी कारवाया करण्यासाठी भारतात पाठवतो. पाकिस्तान आतंकवाद्यांची भरती केंद्रे आणि अड्डे चालवत आहे. तुमच्या (पाकच्या) सीमाभागांत मुक्तपणे आतंकवादी फिरत असतात, तुमच्या सीमारेषेवर त्यांचे नियंत्रण असते. याविषयी पाकिस्तानाला काहीच ठाऊक नाही का ?, असे वक्तव्य भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी केले. ऑस्ट्रियाच्या ओ.आर्.एफ्. वाहिनीच्या एका लोकप्रिय कार्यक्रमात घेण्यात आलेल्या मुलाखतीच्यावेळी पाकिस्तानविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना त्यांनी वरील वक्तव्य केले. ‘आतंकवादी हे सैन्याच्या रणनीतीचा वापर आतंकवादी प्रशिक्षणाच्या कारवायांसाठी करतात’, असेही जयशंकर यांनी म्हटले. जयशंकर पुढे म्हणाले की, आतंकवाद ही जगातील सर्वांत मोठी समस्या आहे. ‘आतंकवाद हा दुसर्‍या देशाचा व्यक्तीगत प्रश्‍न आहे’, असे समजून त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये’, असेही त्यांनी युरोपीय देशांना सुनावले.

पाकची तळी उचलणारा पत्रकार आणि त्याला परखड उत्तर देणारे जयशंकर !

१. मुलाखतीच्या वेळी जयशंकर यांना ‘तुम्ही यापूर्वीही ‘पाकिस्तान हा आतंकवादाचा केंद्रबिंदू आहे’, असे म्हटले होते. पाकसाठी केंद्रबिंदू हा शब्दप्रयोग योग्य आहे का?, असा प्रश्‍न विचारला. (यावरून युरोपीय प्रसारमाध्यमांना पाकिस्तानविषयी पुळका आहे, असे समजायचे का ? – संपादक)

२. त्यावर जयशंकर म्हणाले, ‘‘मी परराष्ट्रनीती तज्ञ आहे, याचा अर्थ असा नाही की, मी खरे बोलू नये. पाकला ‘आतंकवादाचा केंद्रबिंदू’ असे न म्हणता मी अधिक कठोर शब्दप्रयोग करू शकलो असतो. सध्या भारतासमवेत जे काही होत आहे, त्यासाठी ‘केंद्रबिंदू’ हा शब्दप्रयोगही सौम्य आहे. हे (आतंकवादी कारवाया) सर्व दिवसाढवळ्या होत आहे. अशा वेळी आम्ही कसे मानू की, पाकिस्तान एक सार्वभौम देश आहे आणि जो त्याच्या देशावर नियंत्रण ठेवतो आणि त्याला याची माहितीच नाही ? या अड्ड्यांवर आतंकवाद्यांना सैन्यासारखे आणि युद्धनीतीचे प्रशिक्षण दिले जाते.

चीनने करार मोडले आणि सीमेवरील स्थिती पालटण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे चीनसमवेत तणाव कायम  !  – जयशंकर

चीनविषयी बोलतांना परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले की, चीनने भारतासमवेत झालेले करार मोडले आणि प्रत्यक्ष नियंत्रणरेषेला एकतर्फी पालटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच चीनसमवेत तणाव कायम आहे.

जयशंकर पुढे म्हणाले की, हे उपग्रहांचे युग आहे. याद्वारे सीमेवर काय हालचाली चालू आहेत, हे छायाचित्रांद्वारे स्पष्ट दिसते. या छायाचित्रांना तुम्ही नाकारू शकत नाही. चीनशी आमचा करार होता की, सीमेवर दोन्ही देशांनी मोठ्या संख्येने सैन्य तैनात करणार नाही; मात्र चीनने याचे पालन केले नाही. यामुळेच दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण स्थिती आहे. तुम्ही छायाचित्रे पहाल, तर तुमच्या लक्षात येईल की, पहिल्यांदा सीमेवरील भागात सैन्य कुणी पाठवले ?

संपादकीय भूमिका

आतंकवाद्यांची भरती केंद्रे आणि अड्डे नष्ट करून भारत अन् काही प्रमाणात संपूर्ण जगही आतंकवादमुक्त करण्यासाठी भारताने पावले उचलावीत, अशीच जनतेची अपेक्षा आहे !