राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांकडून हिंदूंवर आक्रमण : ४ हिंदू ठार

आधारकार्ड तपासून केला गोळीबार !

दुसर्‍या दिवशी आक्रमणाच्या ठिकाणी बाँबच्या स्फोटात आणखी एक हिंदू ठार

राजौरी (जम्मू-काश्मीर) – जिहादी आतंकवाद्यांनी ख्रिस्ती नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी राजौरीपासून १० कि.मी. अंतरावर असणार्‍या अप्पर डांगरी येथे हिंदूंवर केलेल्या आक्रमणात ४ हिंदू नागरिक ठार, तर ९ जण गंभीररित्या घायाळ झाले. घायाळांवर राजौरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. गंभीररित्या घायाळ झालेल्यांना विमानाद्वारे जम्मूमध्ये नेण्यात आले आहे. मृतांमध्ये सतीश कुमार, दीपक कुमार आणि प्रीतम लाल यांचा समावेश आहे. या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचाराच्या वेळी मृत्यू झाला. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच शिशू पाल, पवन कुमार, रोहित पंडित, सरोज बाला, रिधम शर्मा आणि पवन कुमार अशी घायाळांपैकी काहींची नावे आहेत. २ जानेवारीला याच ठिकाणी झालेल्या बाँबच्या स्फोटात एका हिंदु मुलाचा मृत्यू झाला.

१. अप्पर डांगरी परिसरात १ जानेवारीच्या संध्याकाळच्या सुमारास आतंकवादी एस्.यू.व्ही. चारचाकी गाडीतून आले होते. त्यांनी राममंदिराजवळ रहात असलेल्या हिंदूंना  घराबाहेर बोलावले. त्यांचे आधारकार्ड पाहिले आणि नंतर गोळीबार केला.

. जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले की, पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल अणि सैन्य यांनी अप्पर डांगरी परिसराला घेरले असून आतंकवाद्यांचा शोध घेतला जात आहे. आम्ही लवकरच आतंकवाद्यांना पकडून कारवाई करू.

३. या घटनेच्या व्यतिरिक्त १ जानेवारीला श्रीनगरच्या हवाल चौकात आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २८ व्या बटालियनच्या बंकरवर ग्रेनेड फेकले. यात १ नागरिक घायाळ झाला.

४. तसेच पुलवामाच्या राजपोरा भागात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पोलिसाकडून  २५ वर्षीय इरफान बशीर गनी याने एके-४७ हिसकावून घेतल्याची घटना सकाळी उघडकीस आली. यानंतर सुरक्षादलांनी परिसराला वेढा घातला आणि आतंकवाद्यांचा शोध चालू केला. सायंकाळपर्यंत रायफल हिसकावणार्‍या जिहाद्याला त्याच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात नेऊन शस्त्र परत केले.

संपादकीय भूमिका

जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू आजही जिहादी आतंकवाद्यांपासून सुरक्षित नाहीत, हेच लक्षात येते. तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी केंद्र सरकार काय पावले उचलणार ?