नवी मुंबई, २६ डिसेंबर (वार्ता.) – वाशी येथे विनाअनुमती रस्ता खोदतांना जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा खंडित झाल्याने २ दिवसांपासून पुरेसे पाणी मिळाले नाही. विनाअनुमती खोदकाम करून मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी संबंधित आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात येणार आहे, अशी माहिती वाशी विभागाचे साहाय्यक आयुक्त दत्तात्रय धनवट यांनी दिली.
भूमीगत केबल टाकणार्या एका आस्थापनाने केबल टाकण्यासाठी वाशी सेक्टर ९ येथे २ दिवसांपूर्वी महापालिकेची अनुमती न घेता रस्ता खोदला होता. ही जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. २ दिवस होऊनही वाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्याने टँकरने पाणीपुरवठा केला. टँकरवर पाणी भरतांना उडणारी तारांबळ आणि अपुरे टँकर यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. २६ डिसेंबरला काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत चालू झाला.