वर्ष २०२१ च्या दत्तजयंती निमित्त ग्रंथप्रदर्शनाची सेवा करतांना मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील साधक, धर्मप्रेमी अन् जिज्ञासू यांना आलेल्या अनुभूती आणि समाजातून मिळालेला प्रतिसाद !

७ डिसेंबर २०२२ या दिवशी दत्तजयंती झाली. त्या निमित्ताने…

‘१८.१२.२०२१ या दिवशी अनेक ठिकाणच्या दत्तमंदिरांमध्ये दत्तजयंती उत्सव साजरा झाला. मागील भागात मुंबई आणि ठाणे येथे ग्रंथप्रदर्शनाची सेवा करणारे साधक, तसेच जिज्ञासू यांना जाणवलेली सूत्रे पाहिली. या भागात रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील साधकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

३. शेडवली मंदिर, खोपोली (जि. रायगड) येथील ग्रंथप्रदर्शनात घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना आणि धर्मप्रेमींना आलेल्या अनुभूती

३ अ. श्री. राजेंद्र पावसकर, पनवेल

३ अ १. धर्मप्रेमींनी ग्रंथप्रदर्शनाचे संपूर्ण नियोजन भावपूर्णपणे आणि तळमळीने करणे : ‘या ग्रंथप्रदर्शनाचे पूर्ण नियोजन ८ धर्मप्रेमींनी केले होते. त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यावर स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व बिंबवले. गुरुदेव पूर्वी म्हणाले होते, ‘‘पुढे आपल्याला तयार साधकच मिळणार आहेत.’’ या धर्मप्रेमींच्या माध्यमातून गुरुदेवांच्या मला या वाक्याची प्रचीती दिली. या धर्मप्रेमींकडून मला ‘भावपूर्णपणे आणि तळमळीने सेवा कशी करायची ?’, हे शिकता आले.

३ आ. सौ. योगिता पाटील, खोपोली

३ आ १. जाणवलेली सूत्रे 

अ. ‘सेवा करतांना माझा अहं गळून पडला आहे’, असे मला जाणवले. ‘पुष्कळ लोकांमध्ये जाणे आणि त्यांना काही सांगणे’, हे मी कधी करू शकले नव्हते. या सेवेत मला जिज्ञासूंशी बोलता आले आणि बोलणे ऐकून ते ग्रंथही घेत होते.

आ. ग्रंथप्रदर्शनाची सेवा करत असतांना ‘दत्तगुरु भगव्या वस्त्रांत सूक्ष्मातून फिरत आहेत’, असे मला दिसले.

३ आ २. मुलींनी केलेली सेवा आणि त्यांच्यात झालेले पालट ! : माझ्या दोन्ही मुलींनी (कु. हर्षाली (वय १८ वर्षे) आणि कु. भक्ती (वय १५ वर्षे यांनी)) येणार्‍या जिज्ञासूंची नोंद करण्यासाठी एक नोंदवही बनवली होती. सेवा करतांना त्यांना पुष्कळ आनंद मिळाला. आता त्या नामजप करत आहेत. त्यामुळे त्यांना पुष्कळ शांत वाटते आणि परीक्षेची भीती वाटत नाही.

गुरुदेवांनी मला ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेतून पुष्कळ आनंद दिला. तो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.’

३ आ ३. सौ. योगिता पाटील यांच्या मुलींना आईमध्ये जाणवलेला पालट ! : सौ. योगिता पाटील यांच्या मुली म्हणाल्या, ‘‘सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करायला लागल्यापासून आईच्या चेहेर्‍यावर पुष्कळ आनंद जाणवतो. ‘आईमध्ये झालेला पालट’, ही आमच्यासाठी मोठी अनुभूती असून तिच्यात एवढा पालट होऊ शकतो’, याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही.’’

३ इ. ‘श्री समर्थ उपाहारगृहा’चे मालक श्री. जनार्दन जाधव यांनी ग्रंथप्रदर्शनस्थळी केलेली सेवा ! : या ग्रंथप्रदर्शनावर एका मोठ्या उपाहारगृहाचे मालक श्री. जनार्दन जाधव जिज्ञासूंना ग्रंथांची माहिती सांगत होते. त्यांच्या हाताचा अस्थीभंग झाला होता, तरी ते ५ घंटे सेवेसाठी थांबले होते. ते उपाहारगृहाचे मालक असल्याने त्यांच्या ओळखीचे पुष्कळ लोक ग्रंथप्रदर्शनावर येत होते; पण त्यांना त्याचे काहीच वाटत नव्हते.

३ इ १. ‘दत्तगुरूंनी घेतलेली झोळी हे अहं-निर्मूलनाचे प्रतीक आहे’, असे प्रवचनात ऐकल्यावर ‘अहं-निर्मूलनाचे प्रयत्न करावे’, असे तीव्रतेने वाटून ५ घंटे सेवा केली जाणे : श्री. जनार्दन जाधव म्हणाले, ‘‘मी दत्तजयंतीनिमित्त आयोजित केलेले प्रवचन ऐकायला गेलो होतो. ‘दत्तगुरूंनी घेतलेली झोळी हे अहं-निर्मूलनाचे प्रतीक आहे’, हे ऐकल्यावर ‘मी अहं-निर्मूलनासाठी प्रयत्न केले, तरच दत्तगुरूंची माझ्यावर कृपा होणार आहे आणि त्यासाठीच ‘गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉक्टरांनी) मला येथे सेवा करण्याची संधी दिली आहे’, असे मला वाटले. ‘मी येथे एक मिनिटही थांबून सेवा करू शकणार नाही’, असे मला वाटले होते; पण प्रत्यक्षात मी ५ घंटे थांबून सेवा शकलो. माझ्या अंगात एक वेगळेच चैतन्य आले आहे. मी दत्तगुरूंची ही मोठी कृपा अनुभवली. आतापर्यंतच्या जीवनात कधीच न अनुभवलेला आनंद मी येथे अनुभवला.’

३ ई. श्री. किशोर पडवळ

१. ‘ग्रंथप्रदर्शनासाठी मंदिराच्या विश्वस्तांची अनुमती घेतल्यानंतर त्यांना प्रवचन घेण्याविषयी विचारले. तेव्हा त्यांनी लगेच अनुमती देऊन काही साहित्य दिले अन् ‘फ्लेक्स’वर ‘सनातन संस्था’, असे नावही छापले.

२. आमच्या संपूर्ण कुटुंबाने या सेवेतील आनंद घेतला. माझा मुलगा श्री. प्रथमेश पडवळ (वय १८ वर्षे) याने ग्रंथप्रदर्शनासाठी लागणार्‍या वस्तू आणण्याची सेवा केली. माझी पत्नी सौ. जयश्री पडवळ हिने प्रचार आणि धर्मप्रेमींसाठी महाप्रसाद बनवणे, या सेवा केल्या.’

(श्री. किशोर पडवळ यांचा सेवेप्रती भाव ! : ‘येणार्‍या सर्व लोकांना श्री. पडवळ सनातनच्या ग्रंथांचे महत्त्व सांगत होते. प्रत्येकाने ग्रंथ घ्यावेत, यासाठी ते खूप तळमळीने माहिती सांगत होते. ‘जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉक्टर माहिती सांगतात. गुरुदेवच माझ्या मुखातून बोलतात’, असा त्यांचा अखंड भाव होता.’ – ग्रंथप्रदर्शन सेवेतील साधक)

३ उ. सौ. जयश्री पडवळ

‘धर्मप्रेमींसाठी महाप्रसाद बनवतांना ‘दत्तभक्तांसाठी प्रसाद बनवत आहे’, असा भाव ठेवून मी सेवेसाठी आलेल्या सर्व धर्मप्रेमींसाठी महाप्रसाद बनवला. त्यातून मला पुष्कळ आनंद मिळाला आणि ‘मी धन्य झाले’, असे मला वाटले.

दत्तात्रेयांनी समष्टी सेवा देऊन माझ्यावर पुष्कळ कृपा केली आहे.’

३ ऊ. श्री. शशिकांत पाटील (विद्युत् अभियंता)

३ ऊ १. ‘सेवा करायची आहे’, हे कळल्यावर स्वतःमधील अहंची तीव्रता लक्षात येणे : ‘अहं किती सूक्ष्म असतो. तो कळतही नाही. ‘ग्रंथप्रदर्शनाची सेवा करायची आहे’, या विचाराने मला माझ्यातील अहंच्या तीव्रतेची जाणीव झाली. ‘अहं-निर्मूलनासाठी प्रयत्न करायला हवेत’, हे लक्षात येऊन ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी यासाठीच मला सेवेची संधी दिली आहे’, असे मला वाटले.’

३ ए. सौ. स्नेहल पाटील (शिक्षिका)

३ ए १. सेवा करतांना दत्तगुरूंचे दर्शन होऊन ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे’, याची प्रचीती येऊन सेवेतून आनंद अनुभवणे : ‘ग्रंथप्रदर्शन सेवेत मी जो अनुभवला, तसा आनंद मी कधीच अनुभवला नव्हता. देवच सेवेसाठी निवड करतो आणि तोच सेवा करून घेतो. येथे सेवा करत असतांना मंदिरात दत्तजयंतीचा पाळणा चालू झाला. तेव्हा माझ्या मनात ‘तिथे जावे’, असा विचार आला आणि लगेच देवाने दुसरा विचार दिला की, ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे !’ त्यानंतर मला ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी दत्तगुरु दिसू लागले. मला पुष्कळ आश्चर्य वाटले आणि ‘समष्टी सेवेला ७० टक्के महत्त्व आहे’, याची प्रचीती आली. ‘आज मला जीवनातील खरा आनंद मिळाला’, असे वाटले.’

४. पालघर जिल्ह्यातील साधिकांना आलेल्या अनुभूती

४ अ. सौ. रेखा शेवाळे, विरार

४ अ १. सेवा करतांना अस्थिरता जाणवल्याने दत्तगुरूंना प्रार्थना करणे, तेव्हा ‘त्यांनी डोक्यावर हात ठेवला आहे’, असे जाणवून स्थिर वाटणे : ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मी प्रथमच ग्रंथप्रदर्शन लावण्याच्या सेवेचे नियोजन केले. हे नियोजन करतांना मला कोणत्याच अडचणी आल्या नाहीत; मात्र प्रत्यक्ष सेवा करतांना मला अस्थिरता जाणवल्यामुळे मी प्रार्थना केली. तेव्हा ‘श्री दत्तगुरूंनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर मला स्थिर वाटून पुष्कळ आनंद झाला.

४ अ २. प्रदर्शनाच्या ठिकाणी आलेल्या जिज्ञासूंनी त्यांच्या भ्रमणभाषवर सनातनचे ‘चैतन्यवाणी’ हे ‘ॲप’ ‘डाऊनलोड’ करून घेतले.’ 

४ आ. सौ. अस्मिता पाडेकर, नालासोपारा यांना सौ. रेखा शेवाळे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

४ आ १. आनंदाने, उत्साहाने आणि प्रेमाने बोलून समाजातील लोकांना सनातन संस्थेशी जोडणार्‍या सौ. रेखा शेवाळे ! : ‘दत्तजयंतीच्या दिवशी मला सौ. रेखा शेवाळे यांच्या समवेत ‘ग्रंथप्रदर्शन आणि जिज्ञासूंना संपर्क करणे’, या सेवा मिळाल्या होत्या. सौ. रेखा पुष्कळ आनंदी आणि उत्साही होत्या. त्यांचा लोकांना सहभागी करून घेण्याचा भाग पुष्कळ चांगला होता. त्या सहजतेने समाजातील लोकांना सहभागी करून घेतात. त्यांची समाजातील लोकांशी चांगली ओळख आहे. ओळखीचे कुणी भेटल्यावर त्या त्यांची विचारपूस करून त्यांना सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट द्यायला सांगत होत्या. त्या प्रेमाने आणि आपुलकीने सर्वांना सांगत होत्या. ते पाहून मला वाटले, ‘मला त्यांच्यातील हे गुण शिकता यावेत’, यासाठी गुरुदेवांनी मला त्यांच्या समवेत सेवा करण्याची संधी दिली आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २५.१२.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक