संपर्कात येणार्या सगळ्यांना प्रेमाने आपलेसे करणे, हा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा जन्मजात गुण !
‘माझी मोठी मुलगी सौ. अंजली (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) हिच्या जन्मापासून तिच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भात मला पुढील गोष्टी लक्षात आल्या.
१. अंजलीच्या वेळी दिवस राहिल्यावर ‘मला कसलेही डोहाळे नव्हते’, याचे कारण ‘तिला कशाचीच आसक्ती नाही’, हे लक्षात आले.
२. तिच्या वेळी गरोदर असतांना पाचव्या मासात माझ्या माहेरी (जायगव्हाण, जिल्हा सांगली) येथे असलेल्या गणपति मंदिरात माझ्या आईने माझी ओटी भरली. त्या वेळी गणपतीला प्रार्थना करतांना मला दृष्टांत झाला, ‘गणपति बसलेल्या जागेवरून उठला आणि मीच त्या ठिकाणी जाऊन बसले आहे !’
३. आईने ओटी भरल्यानंतर मी गणपतीला वाकून नमस्कार करत असतांना माझ्या ओटीतील दोन फळांपैकी एक फळ खाली पडले. पुढे माझी जुळ्यांतील एक मुलगी गेली आणि राहिली ती अंजली !
४. अंजली अगदी बाळ असतांना माझे वडील श्री. अनंत लक्ष्मण कानिटकर म्हणायचे, ‘‘ही तुमच्या घरातील राणी आहे.’’ माझ्या वडिलांनी तिला बाळ असतांनाच ओळखले होते. त्याप्रमाणे आता ती खरोखरच सनातनची राणीच झाली आहे. याचा अर्थ तिला आता गुरूंनीच सांभाळले असल्याने तिच्या आयुष्यात कसलेच दुःख नाही.
५. तिला पहिल्यापासूनच खाण्यापिण्याची किंवा इतर कशाची आसक्ती नाही. लहानपणी तिला घास भरवतांना ती तो घास कितीतरी वेळ तसाच तोंडात धरून ठेवायची. दुसरा घास भरवतांना तिच्या तोंडात बोट घालून पहावे लागायचे की, तिने आधीचा घास खाल्ला आहे कि नाही. तसेच ती आपले सर्व इतरांना देऊन टाकायची. तिने स्वतःसाठी कधी काही जमवले नाही. लहानपणीही तिची रहाणी साधी होती, तसेच तिला नवीन कपड्यांचीही विशेष आवड नव्हती.
६. तिला कधीही रागावले, तर ती आमच्यावर रागवायची नाही. हळूच हसून आमचा राग घालवायची आणि वातावरण आनंदी ठेवायची.
७. अनेक कलागुण तिच्या अंगी आहेत. गाणे, चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व, रांगोळी, अभ्यास यांत ती सतत प्रथम क्रमांक मिळवायची. ती लहान-थोर सर्वांशी मैत्री करायची.
८. तिला स्वयंपाक करायची आवड नाही; पण सगळे करायला येते. आता वाटते, ‘त्यासाठी तिचा जन्मच झालेला नाही.’ तिला समाजात रमायची आवड आहे. ‘सगळ्यांना आपलेसे करणे’, हा दैवी गुण तिच्यात जन्मजातच आहे.
९. तिचे केस देवीप्रमाणे लांब आहेत.
१०. एकदा योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन मिरज आश्रमात आले होते. त्या वेळी आम्ही त्यांच्या दर्शनाला गेलो होतो. त्या वेळी ते आम्हाला म्हणाले, ‘‘सौ. अंजलीताई म्हणजे सनातनच्या परराष्ट्रमंत्रीच आहेत !’’
अंजलीविषयी किती लिहिले, तरी ते थोडेच आहे. तिच्यावर विष्णुस्वरूप परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचा कृपाशीर्वाद आहे. ‘त्यांचीच ही सगळी लीला आहे’, असे आम्हाला निश्चितच वाटते.
‘गुरुदेवा, तुमची कृपा तुमच्या या लेकरावर अशीच सतत राहू दे’, ही आपल्या चरणी प्रार्थना.’
– (पू.) सौ. शैलजा परांजपे (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची आई) सांगली (२३.५.२०२०)
नामस्मरण करत असतांना एका दिव्य शक्तीने मुलगी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या जन्माचे आणि त्यांच्यातील जन्मजात गुणांचे रहस्य सांगणे‘एप्रिल २०२० मध्ये एक दिवस दुपारची वेळ होती. ‘दळणवळण बंदी’मुळे सगळीकडे शांतता होती. मी नामस्मरणास बसलो होतो. मन एकाग्र होत होते. त्या वेळी मला एक दृश्य दिसले. त्यामध्ये एक दिव्य शक्ती ३ जिवांना विचारत होती, ‘मी तुम्हाला एका कुटुंबात ३ बहिणी म्हणून जन्माला घालणार आहे. तुमची काय इच्छा आहे ?’ त्या वेळी ते ३ जीव आनंदित होऊन म्हणाले, ‘आमच्यापैकी जी आमची थोरली बहीण असेल, तिला आमच्या दोघींचे कर्तृत्व, बुद्धी, भक्ती इत्यादी सर्व गुण द्या.’ हे सर्व पाहून मी नामस्मरणातून भानावर आलो. मी विचार करू लागलो, ‘आमच्या पोटी या त्याच मुली (जीव) आल्या आहेत. त्यांतील मोठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ असणार. मला धाकट्या दोन्ही मुलींचे कौतुक वाटले. ‘या तीन मुलींचा सांभाळ करणे, त्यांना चांगले संस्कार देणे याचे भाग्य गुरुदेवांनी आम्हाला दिले’, ही केवढी मोठी पुण्याची बाब आहे. ’ – पू. सदाशिव परांजपे (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे वडील), सांगली (२३.५.२०२०) |