श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे छायाचित्रमय दर्शन !

‘आपण देवळात जाऊन देवतेचे दर्शन घेतो; कारण देवाच्या दर्शनाने आपल्याला कृतकृत्य झाल्यासारखे वाटते, तसेच आपल्याला जो आनंद मिळतो किंवा देवतेच्या दिव्य दर्शनाची जी अनुभूती मिळते, ती अवर्णनीय आणि अनमोल असते. त्या दर्शनाने आपल्याला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. अर्थात् त्यासाठी भाव, श्रद्धा आणि साधना यांची आवश्यकता असते.

‘सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये’ (तमिळनाडूतील चेन्नई येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून) श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ‘अवतार’ असे संबोधून ‘श्री महालक्ष्मीस्वरूप’ म्हटले आहे. त्यामुळेच सप्तर्षींनी त्यांना ‘श्रीचित्‌‌शक्ति’ हे नामाभिधान दिले आहे.

हिंदु राष्ट्राच्या, म्हणजे रामराज्याच्या स्थापनेसाठी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या महर्षींनी सांगितल्याप्रमाणे देवदर्शने करत असतांना त्यांची संग्रहासाठी काढलेली काही ठिकाणची छायाचित्रे येथे दिली आहेत. या छायाचित्रांमुळे येणार्‍या अनुभूतींना येथे दिलेल्या कारणांवरून ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे छायाचित्रमय दर्शन’, असे म्हटले आहे. त्यांचे विवरण येथे देत आहे.

वाचकांनी प्रथम ही छायाचित्रे पाहून स्वतः अनुभूती घ्यावी आणि त्यानंतर त्यांचे दिलेले विवरण वाचावे.

संकलक : (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.      

छायाचित्र क्र. १ – सहजभावाचे दर्शन

फेब्रुवारी २०२२ मध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या स्थानिक साधकांसोबत भाग्यनगर (हैदराबाद) येथील प्रसिद्ध गोवळकोंडा किल्ला बघायला गेल्या होत्या. तेव्हा छायाचित्र क्र. १ हे त्या किल्ल्यामध्ये काढलेले त्यांचे छायाचित्र आहे. त्यांच्या या छायाचित्राकडे बघून आपल्याला लगेचच आनंद होतो, तसेच थंडावा जाणवतो. त्यांच्याकडे बघून आनंद होत असला, तरी आपल्याला शांतही जाणवते. वास्तविक येथे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ या कुठल्याही देवदर्शनाला गेल्या नव्हत्या. त्या किल्ला बघायला गेल्या होत्या. आपण एखादा किल्ला बघायला किंवा आणखी कोणत्या पर्यटनस्थळी गेल्यास आपली वृत्ती भगवंताच्या अनुसंधानात रहात नाही. ती बहिर्मुख होते; पण येथे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे पाहून अधिक प्रमाणात शांतीच जाणवते. येथे दिलेल्या सारणीमध्ये ‘त्यांच्याकडून कोणती स्पंदने किती प्रमाणात प्रक्षेपित होत आहेत ?’, ते दिले आहे. त्यामध्येही आनंद आणि शांती यांची स्पंदने अधिक प्रमाणात जाणवली आहेत. यातून ‘परिस्थिती काहीही असो, आपण मनाने शांत आणि स्थिर कसे रहायचे’, हे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळते. त्यांचे सहजभावात रहाणेही आध्यात्मिक स्तरावरचे असते. तसेच त्यांच्या या छायाचित्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यासमोर सरळ रेषेत उभे राहिले असता त्यांचा चेहरा आपल्याकडे बघत असतो; पण आपण त्या सरळ रेषेच्या डावीकडे किंवा उजवीकडे जाऊन कुठल्याही बाजूने त्यांच्याकडे पाहिले, तरी त्या आपल्याकडेच पहात असल्याचे जाणवते. त्या वेळी ‘त्यांचे नुसते डोळेच नव्हे, तर संपूर्ण चेहरा आपल्याकडे वळत आहे’, असे जाणवते. ही त्यांच्यातील वायुतत्त्वाची अनुभूती आहे. एखाद्यातील वायुतत्त्व वाढल्यास त्या व्यक्तीच्या छायाचित्रात जिवंतपणा येतो आणि त्यामध्ये ‘त्या व्यक्तीची हालचाल होत आहे’, असे जाणवते.

छायाचित्र क्र. २ – गाढ ध्यानावस्थेचे दर्शन

जून २०२२ मध्ये तमिळनाडूतील तिरुत्तनीजवळ असलेल्या पुट्टुर गावातील एका मंदिरात मूर्तीप्रतिष्ठापना होती. सप्तर्षींनी तेथे जायला सांगितले होते. त्या मंदिरात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पुजार्‍यांनी देवाचा हार प्रसाद म्हणून दिला. त्या हारातील चैतन्य ग्रहण करण्यासाठी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ या तो हार घालून २ – ३ मिनिटे डोळे मिटून बसल्या होत्या. (छायाचित्र क्र. २ पहा) त्या अल्प कालाधीतही त्यांचे सहज ध्यान लागले होते. इतक्या अल्प कालावधीत इतकी गाढ ध्यानावस्था साध्य होणे, यावरून ‘त्यांच्या मनाची निर्विचारावस्था सतत कशी असते ?’, ते लक्षात येते. त्यांचा मनोलय आणि बुद्धीलय झाला असल्यानेच त्या सतत ईश्वराच्या अनुसंधानात राहू शकतात आणि ईश्वरेच्छेने वागू शकतात. मनोलय आणि बुद्धीलय झाल्याशिवाय साधक ईश्वरेच्छा जाणू शकत नाही आणि त्याप्रमाणे वागूही शकत नाही. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या या छायाचित्राकडे पाहून आपल्यालाही शून्यावस्था प्राप्त होते. ती अवस्था इतकी असते की, ‘आपला श्वास चालू आहे कि नाही’, अशी शंका त्या वेळी आपल्याला येते. येथे दिलेल्या सारणीमध्येही श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यामध्ये शांतीची स्पंदने सर्वाधिक प्रमाणात जाणवली आहेत.

छायाचित्र क्र. ३ – साक्षीभावात दर्शन

सप्टेंबर २०२२ मध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी मध्यप्रदेशमधील ओंकारेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. छायाचित्र क्र. ३ हे त्यांचे गाभार्‍यात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेऊन आल्यानंतर काढलेले छायाचित्र आहे. त्यांच्या या छायाचित्रावरून त्या शिवाच्या दर्शनामुळे त्याच्याशी इतक्या एकरूप झाल्या आहेत की, ‘शिवाचे वैराग्य, साक्षीभाव, निराकारता हे गुण त्यांच्यामध्ये आले आहेत’, असे जाणवते. त्यांच्या डोळ्यांतून त्यांचे ते भाव जाणवतात. त्यांचे हे छायाचित्र पाहून आपणही निर्विचारावस्थेत जातो. तसेच त्यांच्या त्वचेतून पांढरे तेज प्रक्षेपित होत असल्याचेही जाणवते. या छायाचित्रातून त्यांच्यातील जाणवलेली स्पंदने सारणीमध्ये दिली आहेत. त्यामध्येही शांतीची स्पंदने सर्वाधिक प्रमाणात आहेत.

छायाचित्र क्र. ४ – निखळ सुंदरतेचे दर्शन

नोव्हेंबर २०२२ मध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या सप्तर्षींच्या आज्ञेने कर्नाटकातील नागरहळ्ळी येथील नागेंद्रस्वामी देवस्थानात जाणार होत्या. त्या प्रवासाला आरंभ करणार एवढ्यात सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी अचानक दूरभाष करून सांगितले, ‘‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या आज इतक्या सुंदर दिसत आहेत की, त्यांना कोणाचीही दृष्ट लागेल. त्यामुळे प्रथम तुम्ही त्यांची लिंबाने दृष्ट काढा आणि मग नागेंद्रस्वामी देवस्थानी प्रवास करा.’’ यावरून ‘महर्षींना किती कळते आणि त्यांचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे किती लक्ष आहे’, हे समजते. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची दृष्ट काढण्यात आली. दृष्ट काढल्यानंतर त्यांचे छायाचित्र काढण्यात आले. ते येथे दिले आहे. (छायाचित्र क्र. ४ पहा) या छायाचित्रात आपण त्यांच्याकडे एकटक पहातच रहातो, इतक्या त्या निखळ सुंदर दिसत आहेत. या छायाचित्रातील त्यांची जाणवलेली स्पंदने सारणीमध्ये दिली आहेत. त्यामध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यातील चैतन्याचे प्रमाण सर्वाधिक जाणवले आहे. चैतन्य हे सुंदरतेचे प्रतीक असते. याचे एक उदाहरण म्हणजे सोन्याचे सात्त्विक अलंकार. ते आपल्याला सुंदरतेमुळे आकृष्ट करतात.

छायाचित्र क्र. ५ – विराट रूपाचे दर्शन

जून २०२२ मध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वाराणसी येथील काशी विश्वनाथाची पूजा करून झाल्यावर सायंकाळी होडीतून गंगेचे दर्शन घेतले, तसेच गंगेचे दीपपूजनही केले. गंगेचे दीपपूजन झाल्यानंतर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ या होडीमध्ये उभ्या राहून गंगामातेला नमस्कार करत असतांना काढलेले छायाचित्र क्र. ५ आहे. त्या वेळी असे वाटत आहे, ‘त्या विराट रूपात दर्शन देत आहेत.’ त्यांच्याकडे पाहून त्यांची दिव्यता आणि भव्यता यांचे दर्शन होते. त्या वेळी त्यांच्यामागचे आकाशही किती सुंदर दिसत आहे ! त्यामध्ये दिसत असलेली पिवळी आणि निळी छटा जणू श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यातील अनुक्रमे चैतन्य आणि भक्ती यांचेच प्रतीक आहे ! या छायाचित्राचे सूक्ष्म परीक्षण केल्यावर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यात त्या वेळी जाणवलेली स्पंदने खाली सारणीत दिली आहेत. त्यामध्येही छायाचित्रातील आकाशात दिसत असल्याप्रमाणे चैतन्य आणि भाव यांचीच स्पंदने अधिक प्रमाणात जाणवली आहेत.

छायाचित्रांतील स्पंदनांचे प्रमाण !

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

मला श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वेगवेगळ्या छायाचित्रांतून कोणकोणती स्पंदने प्रक्षेपित होत आहेत आणि त्या छायाचित्रांची वैशिष्ट्ये काय आहेत, याचे ज्ञान मिळाले. यासाठी मी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (२६.११.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद्गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक